पिंपरी-चिंचवड महापालिकेने सफाई कामगारांना मास्क व सुरक्षा साधने तातडीने द्यावेत; सतीश कदम यांनी आयुक्तांकडे केली मागणी

पिंपरी, दि. २१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात साफसफाईचे काम करणारे, कचरा गोळा करणारे कामगार आणि कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या घंटागाडीवरील वाहनचालकांना गणवेश, हातमोजे, मास्क आणि सॅनिटायझर किंवा साबण देऊन माणुसकी दाखवा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता शहरातील सफाई कामगार अद्यापही असुरक्षितपणे साफसफाईचे काम करीत आहेत. शासनाने उपाययोजना सुचवूनही महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाई कामगार, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे कामगार आणि कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या घंटागाडीवरील वाहनचालकांना हातमोजे, मास्क, सॅनिटायझर किंवा साबण दिलेले नाही.

कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग अधिनियातील तरतूदीनुसार प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या जात आहेत. पिंपरी-चिंचवडमधील सर्व सरकारी व खासगी शाळा, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये व प्रशिक्षण केंद्रे व खासगी कोचिंग क्लासेस यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. महापालिकेकडूनही सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असूनही, सफाई कामगार आजही असुरक्षित स्थितीत काम करताना दिसत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, सर्वात आधी या सफाई कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने तातडीने पुरविण्यात यावेत.

तसेच सफाईसाठी लागणारे साहित्य तसेच शहरातील उपलब्ध असलेल्या फॉगिंग मशिन फारच कमी आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात फॉगिंग मशिन उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून तातडीने पाऊल उचलण्याची आवश्यकता असल्याचे सतीश कदम यांनी म्हटले आहे.”

Share this to: