अजितदादा पिंपरी-चिंचवडकडे फिरकेच ना, राष्ट्रवादीने शहराला वेठीस धरले; साई चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा – अमोल थोरात

पिंपरी, दि. २१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सांगवी ते रावेत बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन महिना झाला आहे. प्राधिकरणाने पूल उभारला आहे म्हणून पालकमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा राष्ट्रवादीने अट्टहास धरला आहे. मात्र पालकमंत्री पिंपरी-चिंचवडकडे फिरकायला सुद्धा तयार नसल्यामुळे राष्ट्रवादीने उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करून नागरिकांना अक्षरशः वेठीस धरले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणा-या नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस असा आणखी किती छळ करणार आहे?, असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केला आहे. शहरातील नागरिकांच्या संयमाची परीक्षा न पाहता प्राधिकरण प्रशासनाने हा उड्डाणपूल दोन दिवसांत वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड शहर भाजप संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी ते रावेत हा बीआरटीएस रस्ता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला जो़डणारा आहे. तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणा-या रस्त्यांना जोडणाराही हा प्रमुख बीआरटीएस मार्ग आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपळेसौदागर आणि पिंपळेनिलख या दोन्ही परिसराला महत्त्व प्राप्त करून हा प्रमुख बीआरटीएस मार्ग आहे. त्यामुळे या बीआरटीएस मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या मार्गावर पिंपळेनिलख येथे साई चौकात चारही बाजूने येणारे रस्त्यांचे जंक्शन आहे. त्यामुळे या चौकात वाहनचालकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः हिंजवडी आयटी पार्ककडे जाणा-या अभियंता व इतर चाकरमान्यांना जाता-येता साई चौकातील वाहतूककोंडीमुळे प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो.

साई चौकातील ही वाहतूककोंडी आणि वाहनचालकांना सहन करावा लागणारा मनःस्ताप करण्यासाठी या चौकात सांगवी ते रावेत बीआरटीएस मार्गावर उड्डाणपूल आणि पिंपळेसौदागर ते पिंपळेनिलख मार्गावर ग्रेडसेपरेटर उभारण्याचे काम भाजपने हाती घेतले. प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम झाल्यानंतर तो मार्ग भाजपने वाहतुकीसाठी तातडीने खुला केला. आता या उड्डाणपुलाच्या दुस-या बाजूचे कामही पूर्ण झाले आहे. या चौकातील वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेऊन भाजपने उड्डाणपुलाची दुसरी बाजूही नागरिकांसाठी तातडीने खुले केले. मात्र पिंपरी-चिंचवडकडे फिरकतही नसलेले पालकमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते उड्डाणपुलाची दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचा अट्टहास राष्ट्रवादीने धरला आहे. त्यामुळे प्राधिकरण प्रशासनावर दबाव आणून वाहतुकीसाठी खुली केलेली उड्डाणपुलाची दुसरी बाजू राष्ट्रवादीने बंद करून टाकली आहे.

विकासकामांतही दादागिरी करणा-या राष्ट्रवादीने नागरिकांच्या हिताचा विचार न करता फक्त श्रेय लाटण्यासाठी म्हणून पोलिस संरक्षणाखाली उड्डाणपुलाची दुसरी बाजू मातीचा ढिगारा टाकून बंद केले. सामान्यांनी पोलिस बंदोबस्त मागितल्यास त्यांच्यासाठी तो उपलब्ध नसतो. मात्र त्याच सामान्यांसाठी खुला केलेला उड्डाणपूल बंद करण्यासाठी राष्ट्रवादीकडे पोलिस बंदोबस्त उपलब्ध असल्याचे भयानक चित्र शहरवासीयांना अनुभवायास मिळत आहे. राष्ट्रवादीने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करून दहा दिवस उलटून गेले आहेत. दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवडकडे फिरकायला तयार नाहीत. त्यांची वेळ मिळत नाही. तरीही त्यांच्याच हस्ते हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्याचा राष्ट्रवादीचा अट्टहास आहे. हा सर्व प्रकार शहरातील सर्वसामान्यांना संताप आणणारा आहे. सांगवी ते रावेत या बीआरटीएस रस्त्यावरून वाहतूककोंडीचा सामना करत दररोज प्रवास करणा-या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस आणखी किती दिवस वेठीस धरणार आहे?, असा सवाल अमोल थोरात यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या तालावर नाचणा-या प्राधिकरण प्रशासनाने नागरिकांना वेठीस न धरता हा उड्डाणपूल दोन दिवसांत वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.”

Share this to: