दिल्लीत जाण्याची इच्छा नाही, महाराष्ट्रातच काम करायचे आहे – खासदार संजय काकडे

पुणे, दि. १२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मला डावलण्यात आलेले नाही. राज्यसभेवर जाण्यात मला काहीही रस नव्हता. दिल्लीत जाण्याची इच्छा नाही आणि मला तिथे करमणार नाही. मला महाराष्ट्रातच राहायचे आहे, असे खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.

भाजपाकडून राज्यसभेसाठीचे तिसरे तिकिट मलाच मिळेल असा दावा संजय काकडे यांनी केला होता. ते न मिळाल्याने संजय काकडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण नाराज नाही हे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत जाण्यात आपल्याला काहीही रस नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

संजय काकडे म्हणाले, “मला राज्यात चांगली जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मला राज्यात काम करायला आवडेल. जी जबाबदारी मिळेल ती स्वीकारायला तयार आहे. राज्यसभेसाठी आठ ते दहा जण इच्छुक होते. मीही भाजपचा सहयोगी होतो. त्यामुळे पक्षाने जुन्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे आहे, असे मला पक्षाकडून सांगण्यात आले आहे. दुःख याचे आहे की एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांना द्यायला हवी होती. त्यांच्यावर अन्याय झाला आहे.”

Share this to: