सांगवीतील विविध चौकांत लावलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा; ललित म्हसेकर यांची मागणी

चिंचवड, दि. १० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सांगवीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साई चौक व अन्य चौकांत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग धोकादायक पद्धतीने लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणासोबतच अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या अनधिकृत होर्डिंगवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभा अध्यक्ष ललित म्हसेकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात ललित म्हसेकर यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सांगवी भागातील सर्वच चौकात रहदारीच्या सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग धोकादायक पद्धतीने उभारण्यात आले आहेत. शहराच्या अन्य भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे. अशा अनधिकृत होर्डींगमुळे शहराच्या विद्रुपीकरणासोबतच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. अनधिकृत होर्डिंग लावणारे महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागातील अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून हा प्रकार करत आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केल्यास कारवाईसाठी यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ही कारणे दिली जात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनावर असणारा सर्वसामान्यांचा विश्वास उडत चालला आहे. या विभागातील कामचुकार व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याआधी सांगवी परिसरासह शहराच्या अन्य चौकांत सार्वजनिक ठिकाणी धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डींगवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी म्हसेकर यांनी केली आहे.”

Share this to: