सांगवीतील पवनाथडीला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांनी बनविलेल्या वस्तूंना जास्त मागणी

चिंचवड, दि. ७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यूीडी मैदानावर आयोजित पवनाथडी जत्रा गेल्या तीन दिवसांपासून उत्साहात सुरु आहे. या जत्रेला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांनी बनवलेल्या लोणची, पापड, मसाले यांना मागणी आहे.

पवनाथडी जत्रेस आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसेविका शारदा सोनवणे, आरती चोंधे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, नगरसेवक हर्षल ढोरे, सागर आंगोळकर, संतोष कांबळे, माजी नगरसेवक अशोक सोनवणे, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप आदींनी भेट दिली.

जत्रेत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला ‘मामाचे गाव’ साकारण्यात आले आहे. प्रवेश केल्यापासूनच जत्रेचा माहौल पाहायला मिळतो. तरुण, महिला यांच्यासाठी खास सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. त्यामुळे तरुणांचे ग्रुप फोटो काढण्यासाठी याठिकाणी गर्दी होत आहे. याठिकाणी टेलिस्कोपमधून चंद्र पाहण्याची सोयही करण्यात आली आहे. यंदाच्या पवनाथडीमध्ये वैविध्यपूर्ण वस्तूंची रेलचेल पाहायला मिळते. खाद्य पदार्थांबरोबरच खास शिवलेले खणाचे ड्रेस, वुडन आर्टच्या आकर्षक वस्तू, मातीच्या वस्तू, उपवासाचे फराळाचे पदार्थ, लाकडी खेळणी पाहायला मिळतात. तसेच खास गावाकडची चव असलेले पापड, लोणची, मसाले यांचीही जत्रेत रेलचेल आहे. शहरात न मिळणाऱ्या गव्हाच्या कुरडया, हाताने बनवलेल्या गव्हाच्या शेवया यांना महिला पसंती देत असल्याचे दिसून येते.

खरेदी विक्रीच्या स्टॉलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही पवनाथडीत पाहायला मिळते. पवनाथडीमध्ये दररोज सायंकाळी वेगवेगळ्या स्थानिक आणि इतर संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची संधी महापालिकेने दिली आहे. पवनाथडीच्या तिसऱ्या दिवशी दिग्दर्शक संतोष पवार यांचे यदा कदाचित हे विनोदी नाटक सादर झाले. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी शिंदे व किशोर केदारी यांनी केले.

Share this to: