दम असेल तर पिंपरी-चिंचवडमधील गाववाल्यांच्या विरोधात लिहून दाखवा; आयुक्तांना शिवीगाळ केलेल्या नगरसेविकेने ओकली पत्रकारांविरोधात गरळ

पिंपरी, दि. २५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत फार मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गवगवा करून सत्तेत आल्यानंतर स्थायी समिती सभापतीपदाच्या माध्यमांतून दोन पिढ्यांचे कोटकल्याण होईल एवढी कमाई करून तृप्त झालेल्या एका नगरसेविकेने त्यांना प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांच्या विरोधातच मंगळवारी (दि. २५) गरळ ओकली. पत्रकार फक्त आमच्या विरोधातच लिहितात. गाववाल्या नगरसेवकांच्या विरोधात काहीच छापत नाहीत. गाववाले महापालिकेतून कोट्यवधी रुपये कमावितात. आमच्या माध्यमातूनही गाववाल्यांची कोट्यवधींची कमाई सुरू आहे. दम असेल तर काही पत्रकारांनी गाववाल्यांच्या विरोधात छापून दाखवावे, असे म्हणत संबंधित नगरसेविकेने सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी उलटी केली. धक्कादायक बाब म्हणजे गाववाल्यांच्या विरोधात असणारी पोटातील ही मळमळ बाहेर काढताना संबंधित नगरसेविकेला स्थायी समितीचे सभापतीपद हे गाववाल्यांच्याच पाठिंब्यामुळे मिळाली होती, याचा सोयीस्कर विसर पडल्याचे दिसून आले. तसेच याच नगरसेविकेने आठवडाभरापूर्वी टक्केवारी मिळावी म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आली. महापालिकेत सत्ता आल्यानंतर शहराचे नेतृत्व करणाऱ्या गाववाल्यांनी सलग दोन वर्षे महापालिका तोजोरीच्या चाव्या महिला नगरसेविकांकडे दिली. त्यातील एका नगरसेविकेचे ब्लॅकमेलिंगच्या कारभाराचे खरे रुप माहिती असतानाही स्थायी समिती सभापतीपद दिले. स्थायी समिती सभापतीपदाच्या खुर्चीवर विराजमान होताच या नगरसेविकेने आपले खरे रुप दाखविण्यास सुरूवात केली. कोणालाही विश्वासात न घेता या नगरसेविकेने एककल्ली कारभार केला. आपल्या अनेक नातलगांना कोट्यवधींची कंत्राटे मिळवून दिली. सभापती असताना या नगरसेविकेवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. विरोधकांनी तर सोडाच स्वपक्षाच्या वरिष्ठ पदांवरील नेत्यांनीही या नगरसेविकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र या नगरसेविकेने “मी नाही त्यातली” असे दाखवत पिंपरी-चिंचवडच्या करदात्यांना ओरबाडणे सुरूच ठेवले. त्यातून या नगरसेविकेने दोन पिढ्यांचे कोटकल्याण होईल एवढी कमाई केल्याचे उघड गुपित आहे. त्याची आजही महापलिका वर्तुळात उघडपणे चर्चा होत असते. स्थायी समितीच्या माध्यमातून भरपूर कमाई झाल्याने तृप्त होऊन या नगरसेविकेने सभापतीपद संपताच पिंपरी-चिंचवड शहरातून राजकीय पळ काढला होता.

मात्र आता संबंधित नगरसेविका पुन्हा महापालिकेच्या इमारतीत फिरू लागली आहे. महापालिकेच्या अनेक विभागाशी पत्रव्यवहार करत अधिकाऱ्यांना टक्केवारीसाठी ब्लॅकमेलिंग सुरू केले आहे. तसेच सत्तारूढ पक्षनेत्याच्या कार्यालयात ठेकेदारांना बोलावून टक्केवारीसाठी दमदाटी सुरू केली आहे. आपण डोळे मिटून दूध पित असल्याच्या अविर्भावात असलेल्या या नगरसेविकेने टक्केवारी मिळावी म्हणून आठवडाभरापूर्वी थेट महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. शिवीगाळ होऊनही आयुक्त हर्डीकर यांनी शेपूट घालणे पसंत केले. एखादा प्रामाणिक आयुक्त असता तर संबंधित नगरसेविकेचे नगरसेवकपद रद्द केले असते. परंतु, तसे घडले नाही. आयुक्त भाजपचा घरगडी असल्याचे विरोधकांनी केलेले आरोप हर्डीकर यांनी खरे करून दाखविले.

या घटनेची बातमी छापून येऊ नये म्हणून संबंधित नगरसेविकेने काही पत्रकारांनाही अर्थपूर्ण मॅनेज केले. मात्र “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने ही बातमी छापल्याने संबंधित नगरसेविकेचा तिळपापड झाला आहे. या रागाच्या भरात त्यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. तसेच मंगळवारी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या शेजारी बसून या नगरसेविकेने पत्रकारांशी बोलताना पत्रकारांविरोधातच गरळ ओकली. तसेच ज्या गाववाल्यांनी त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले, त्या गाववाल्यांविषयी पोटात असलेली मळमळ बाहेर काढली. गाववाले नगरसेवक महापालिकेत कोट्यवधी रुपये कमावितात. काही गाववाले अब्जाधीश झाले आहेत. काही गाववाले ठेकेदारांना पिस्तुल लावून पैसे उकळतात. त्याबाबत पत्रकार काहीच लिहीत नाहीत. गाववाले धुतल्या तांदळासारखे नाहीत. महापालिकेत ठेके असलेल्या गाववाल्या नगरसेवकांची संपूर्ण माहितीच सर्वसाधारण सभेत मांडणार आहे.

आम्ही बाहेरून येऊन प्रचंड संघर्ष करत नगरसेवक झालो. माहापिलकेच्या माध्यमातून आम्ही लाखांवरून कोट्यधीश झालो तर काही स्वार्थी पत्रकारांच्या डोळ्यात खुपू लागले आहे. गाववाल्यांच्या विरोधात काहीच छापत नाहीत. फक्त आमच्या विरोधातच छापत असतात. दम असेल, तर पत्रकारांनी गाववाल्यांच्या विरोधात छापून दाखवावे, असे म्हणत संबंधित नगरसेविकेने सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी उलटी केली. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासमोरच संबंधित नगरसेविका गाववाल्यांविरोधात बडबड करत होती. विशेष म्हणजे संबंधित नगरसेविकेला प्रसारमाध्यमांनीच मोठे केल्याचे सत्य सर्वजण जाणून आहेत. आज त्याच नगरसेविका पत्रकारांच्याच विरोधात गरळ ओकून आपले खरे रूप दाखविल्याने पत्रकार सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

Share this to: