विधानसभेला दीड लाखांचे मताधिक्य मिळवणाऱ्या अजित पवारांची कारखाना निवडणुकीत ११ हजार मते मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला

बारामती, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पन्नास वर्षांपासून बारामती विधानसभा, लोकसभा निवडणुकीत केवळ प्रचाराची एक सांगता सभा घेऊन जिंकण्याची पवार घराण्याची परंपरा आहे. मात्र बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जुन्या मित्रानेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेरीस आणले आहे. येत्या रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होत असून तावरे यांचे सहकार बचाव पॅनल विरुद्ध अजित पवारांचे श्री नीलकंठेश्वर पॅनल असा हा सामना रंगणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना १ लाख ६७ हजार मतांचे मताधिक्य लाभले. मात्र बारामती तालुक्यातीलच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या फक्त ११ हजार ५०९ सभासदांची मते मिळवण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून या कारखान्यावर शरद पवारांचे जुने मित्र, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचे वर्चस्व आहे. कारखान्याच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणीत तावरे गटाने २१ पैकी १५ जागा जिंकून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवला होता. उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक ३४०० रुपये भाव देऊन तावरे गटाने कारखान्याचा विस्तार केला आहे. यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या नाकीनऊ आले असून अजित पवार ठिय्या देऊन आहेत. कारखाना ताब्यात घेण्यासाठीच बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घाईघाईने नीरा-देवघरचे पाणी बारामतीला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शरद पवारांचा सन्मान विरुद्ध उसाला विक्रमी भाव

कारखाना ताब्यात नसल्याने शरद पवार गेल्या पाच वर्षांत कारखान्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे यंदा सत्ता मिळवून शरद पवारांना माळेगाव साखर कारखान्यात सन्मानाने नेण्यासाठी श्री नीलकंठेश्वर पॅनल निवडून देण्याचे भावनिक आवाहन अजित पवारांकडून सभासदांना होत आहे.

शरद पवारही कारखान्याचे सभासद

पवारांच्या गोविंदबाग येथील बंगल्यातून दिसणाऱ्या माळेगाव कारखान्याचे शरद पवारही सभासद आहेत. शरद पवारांना १९६७ मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीत सावलीसारखी साथ देणारे त्यांचे तत्कालीन राजकीय मित्र चंद्रराव तावरे यांचे तीन दशकांपूर्वी अजित पवारांशी मतभेद झाले. कारखान्याच्या अध्यक्षपदावरून डावलल्याने तावरे गटाने आपला सवतासुभा निर्माण केला अन् माळेगाव सहकारी कारखान्याची सत्ता अजित पवारांच्या हातातून खेचून आणली. रंजन तावरे हे कारखान्याचे अध्यक्ष बनले. सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. सध्या माळेगाव सहकारी साखर कारखाना भाजपप्रणीत तावरे गटाच्या ताब्यात आहे.

राष्ट्रवादीचे प्रचाराचे मुद्दे

> नीरा-देवघरचे पाणी बारामतीला वळवले

> शरद पवारांच्या सन्मानासाठी निवडून द्या

> कारखान्याचा अतिरिक्त खर्च वाढला

भाजपप्रणीत तावरे गटाचे प्रचाराचे मुद्दे

> शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक ३४०० रुपये भाव.

> राष्ट्रवादीच्या ताब्यातील सोमेश्वर, छत्रपती कारखाना तसेच रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्यापेक्षा अधिक.

> उत्कृष्ट व्यवस्थापन, कारखान्याचा विस्तार

Share this to: