भाजपचा शरद पवार यांना टोला, “लोका सांगे ब्रह्मज्ञान”; सोशल मीडियावर कार्टून व्हायरल

मुंबई, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – विरोधी पक्षनेते देवेंद्र यांना एका प्रकरणात न्यायलयात हजर राहावे लागल्यानंतर आता भाजपा आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. त्यावर आता भाजपानं कार्टूनच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

भाजपानं हे कार्टून टि्वट केलं आहे. त्यात देवेंद्र फडणवीस कोर्टात जाताना दाखवले आहेत. त्यांच्या हाती एक फाईल आहे, त्यावर “जनतेसाठी आंदोलन करतानाचा खटला” असं लिहिलेलं आहे. त्यांच्या मागे तिघे दाखवले आहेत. त्यात शरद पवार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड आहेत. “लपवाछपवी करू नका!” असं त्यांना म्हणताना दाखवलं आहे. पण हे दाखवतानाच त्यांच्या मागे एक कपाटात घोटाळ्यांच्या फायली बाहेर येताना दिसताहेत. त्यात सिंचन घोटाळा, लवासा घोटाळा, राज्य सहकारी बँग घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा… अशा फायलींचा समावेश आहे. यावर कार्टूनमध्ये “लोका सांगे ब्रह्मज्ञान…” असा एक टोला लगावलाय. हे कार्टून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

महाराष्ट्र भाजपानं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, “चोराच्या उलट्या बोंबा!! @ncpspeaks तुम्ही जनतेचा पैसा स्वार्थासाठी लाटला आणि  @dev_fadnavis यांनी जनतेसाठी घेतला अंगावर खटला.”

नेमके प्रकरण काय?

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ३० मार्च रोजी पुढच्या सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे. या प्रकरणामुळे सध्या सत्ताधारी पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

Share this to: