वाघ आहे का बेडूक?; CAA वरून भूमिका बदलणाऱ्या शिवसेनेवर मनसेची बोचरी टीका

मुंबई, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. केंद्र सरकारच्या या कायद्याला देशभरातून विरोध होताना दिसतो आहे. आजही अनेक भागांत CAA विरोधात निदर्शनं होतं आहेत. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्तेत आलेल्या शिवसेनेने CAA ला आता आपला पाठींबा दर्शवला आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली.

या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी, CAA ला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे असं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याचा धागा पकडत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

लोकसभेत शिवसेनेने CAA ला आपला पाठींबा दर्शवला होता. मात्र राज्यसभेत शिवसेना खासदारांनी CAA, NRC वर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. तोच धागा पकडून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी  शिवसेनेवर टीका करणारे ट्विट केले आहे. लोकसभेत CAA, NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध, पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा वाघ आहे का बेडूक…..अशी बोचरी टीका केली आहे.

CAA वर काय म्हणाले उद्धव ठाकरे??

सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्द्यांवर पंतप्रधानांसोबत माझी चर्चा झाली. या मुद्द्यांवर यापूर्वीच मी माझी भूमिका सामना मध्ये मांडली आहे. सीएएला घाबरण्याचं काहीही कारण नाही. हा कायदा कुणालाही देशातून काढण्यासाठीचा कायदा नाही. एनआरसीबाबत जे वातावरण तयार केलं जातं आहे की मुस्लिमांनाच त्रास होणार ते चुकीचं आहे. सगळ्यांनाच आपल्या नागरिकत्वासाठी रांगेत उभं रहावं लागणार आहे. या मुद्द्यावरुन ज्यांनी आंदोलन भडकवलं आहे त्यांनी कायदा आणि इतर गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

Share this to: