अभियंत्यांनी पदवी व ज्ञानाचा उपयोग समाजोन्नतीसाठी करावा – डॉ. एम. एस. चासकर

पुणे, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – अभियंत्यांनी आपल्या पदवीचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीकरता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. चासकर यांनी केले.

शिवाजीनगर येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच पदवी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चासकर बोलत होते. यावेळी संस्थेचे सहसचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी डॉ दीपक निघोट, विद्यार्थी प्रतिनिधी अंजली चौधरी आदी उपस्थित होते.

डॉ. चासकर म्हणाले, “आपण ज्या शाखेचे शिक्षण घेवून पदवीधारक झाला आहात त्याच शाखेत अधिकाधिक संशोधन करून कार्यरत असणे अभिप्रेत आहे. तुमच्यातील विद्यार्थ्याला कायम जागृत ठेवा. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्राने मोठे प्रगती केली असून त्याचा फायदा समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचायला हवा. या क्षेत्रात संशोधनाच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून आपण अभियंत्यांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. स्टार्ट अपच्या माध्यमातून अनेक संधी तुमची वाट पहात आहेत.”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे म्हणाले, “महाविद्यालयाने चार वर्षाच्या कालावधीत तुम्हा सर्वांना उत्तम अभियंता बनवले आहे. आता तुम्हाला तुमच्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या जोरावर यशोशिखर गाठायचे असल्याचे सांगितले.”

संस्थेचे सचिव श्री मालोजीराजे छत्रपती यांनी गुणवंतांना उज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. कल्याणी कुलकर्णी यांनी केले. अंजली चौधरी यांनी आभार मानले.

Share this to: