एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ वी आविष्कार स्पर्धा उत्साहात

पुणे, दि. १४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिवाजीनगर येथील एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात नव आविष्कारांना साद देत ग्रामीण विभागासाठी १४ वी आविष्कार स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले. यावेळी संतोष खरात विभाग अधिकारी (अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष, आयक्यूएसी), डॉ मनीष वर्मा (अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष), एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे, अविष्कारचे महाविद्यालीन समन्वयक डॉ. विद्या पाटील, प्रा. आर. आर. इटकरकर तसेच महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्याणी संत यांनी केले. डॉ. विद्या पाटील यांनी आभार मानले.

राज्याचे तत्कालिन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी २००६ मध्ये ‘अविष्कार’ नावाच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी आंतर विद्यापीठ संशोधन प्रकल्प स्पर्धा सुरू केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग तेरा वर्षांत राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत ९ वेळा विजेतेपद व चार वेळा उपविजेतेपद मेळविले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अविष्कार २०१९ स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी शनिवारी (११ जानेवारी) शिवाजीनगर येथील ‘एआयएसएसएमएस’ अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जवळपास १६३ प्रकल्प निवडण्यात आले होते. यामध्ये अत्याधुनिक थ्रीडी प्रिंटिंगपासून कृषी विषयाशी निगडित वितरण व्यवस्था ते सुरक्षा सबंधित प्रकल्प आहेत. आरोग्य यंत्रणेमधील तंत्रज्ञान, असेही संशोधन प्रकल्प विषय विद्यार्थ्यांनी हाताळले आहेत.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन वेबसाईट माध्यमातून करण्यात आली. त्यातून निवडलेले ग्रामीण प्रकल्पांचे सादरीकरण व मार्गदर्शन या फेरीत केले गेले. यातून विद्यापीठ स्तरावर प्रकल्प निवडण्यात आले. त्यांची पुढील फेरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये २१ जानेवारी रोजी पोस्टर स्वरूपात आयोजित केले आहे. यातून निवडलेले प्रकल्प मुंबई विद्यापीठामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत.

नवीन बदलानुसार या प्रकल्पांची माहिती व एकत्रीकरण वेबसाईटवर करण्यात आले आहे. याचा वापर फक्त स्पर्धा कालावधीतच नाही तर वर्षभर होईल, असे समन्वयक डॉ. मनीष वर्मा (अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षा, IQAC व ‘अविष्कार’) यांनी सांगितले. या संशोधनाचा उपयोग सामाजिक व सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल. या संशोधकांमधून उद्योजक निर्माण करता येतील, अशी व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी करावयाची आहे, अशी माहिती संतोष खरात विभाग अधिकारी (अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षा, आयक्यूएसी) यांनी दिली. या उपक्रमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची ‘यशोगाथा’ पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली आहे.

डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी शिक्षणाच्या साच्यातुन मुक्त होण्यासाठी संशोधन कसे आवश्यक आहे हे सांगितले. आपले स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण काम, या कामातुन मिळणारा आनंद व या कामाला मिळणारी समाजमान्यता या क्रियेतून तो माणूस शास्त्रज्ञ घडत असतो, असे त्यांनी या नवसंशोधकना सांगितले.

Share this to: