राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या नगरसेवक भावाची कामगारांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई, दि. १४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – व्हीव्हीआयपी संस्कृतीच्या मुजोरपणाचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नगरसेवक भाऊ कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते कामगारांना मारहाण करताना त्यांना कमाबद्दल विचारणा करीत आहेत. तसेच हे कामगार आपल्याला मारु नका, अशी विनवणी त्यांच्याकडे करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये कप्तान मलिक रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगारांना एकामागून एक मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकराबाबत मलिक यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही, टाइम्सनाऊ न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मुंबईत सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची कामं सुरु आहेत. अशाच एका कामाच्या ठिकाणी काही कामगार काम करीत असताना नगरसेवक कप्तान मलिक यांनी त्यांच्याकडे या कामाची परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली. मात्र, याची माहिती नसल्याचे सांगताच चिडलेल्या कप्तान मलिक यांनी या कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करीत पुन्हा या भागात दिसल्यास हातपाय तोडण्याची धमकीही दिली. व्हिडिओमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे.

Share this to: