वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे होता मान; उदयनराजेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

पुणे, दि. १४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – “वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान;” असा सवाल छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकासंदर्भात शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भूमिका मांडावी अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेचा उद्यनराजेंनी चांगलाच समाचार घेतला आहे.

उदयनराजेंनी आज (मंगळवारी) पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकासंदर्भात वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. “शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?,” असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी विचारला. “शिवाजी महाराजांच्या सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी आहे,” अशा शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका केली.

शिववडावरुन टीका…

सोयीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा आणि सोयीप्रमाणे त्यांच्या नावाचा विसर पडू द्यायचा हेच काम राजकीय पक्षांकडून सुरू असल्याची टीकाही उदयनराजेंनी केली. याचसंदर्भात बोलताना त्यांनी थेट वडापावला शिवाजी महाराजांचे नाव दिल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला. शिवसेनेवर टीका करताना उदयनराजेंनी शिववडा योजनेवरुन सत्ताधारी पक्षावर टीकास्र सोडले. “शिववडा हे नाव कुठून आले. महाराजांच्या नावाचा असा वापर का केला गेला. शिववडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं,” असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

काय आहे शिववडा योजना

बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शिवसेनेने ‘शिव वडापाव’ योजना सुरू केली. या योजनेसाठी शिव सहकार सेवा सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘शिव वडापाव’ची गाडी मिळविण्यासाठी दादर येथील शिवसेना भवनामध्ये संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केल्यानंतर किमान एक ते कमाल सहा महिन्यांत अर्जदाराला ‘शिव वडापाव’ची गाडी देण्यात येत होती. या गाडय़ा दोन प्रकारच्या होत्या. आकाराने लहान असलेल्या गाडीसाठी ५५ हजार रुपये, तर थोडय़ा मोठय़ा गाडीसाठी ६० हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली होती. या गाडीसाठी स्थानिक शाखाप्रमुखाची शिफारस बंधनकारक करण्यात आली होती. या सर्व गाडय़ांवर एकाच चवीचा वडा मिळावा यासाठी खास मसाला तयार करण्यात आला होता, हा मसाला केवळ शिवसेना भवनात उपलब्ध असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

पालिकेचीच कारवाई

मात्र २०१६ साली मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेच्या परवानगीशिवाय मुंबईत गल्लीबोळात विनापरवाना लावल्या जाणाऱ्या या गाडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या गाड्यांवर पालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेलाच कारवाई करावी लागली होती. त्यावेळी शहरात २५० हून अधिक ‘शिव वडापाव’च्या गाडय़ा चालवल्या जात होत्या.

Share this to: