शिवाजी महाराज राहू देत आजोबांचा विचार तरी अंमलात आणा; उदयनराजेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

पुणे, दि. १४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिवाजी महाराज राहू दे.. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अमलात आणा असा खोचक टोला उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उदयनराजे भोसले यांनी या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचाही समाचार घेतला. एवढंच नाही तर शिवसेनेचे नाव आता ठाकरे सेना करावे असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर उदयनराजे यांनी भूमिका मांडली. या पुस्तकाला त्यांनी विरोध दर्शवला आहे.

पुस्तकाबाबत ऐकून वाईट वाटलं, मला एकट्यालाच नाही महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना होईल इतकी उंची जगात कुणाचीही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणासोबतच होऊ शकत नाही. मी या कुटुंबात जन्माला आलो, मी या वंशाचा भाग आहे याचा मला अभिमान आहे असंही उदयनाराजे म्हणाले.

याचपाठोपाठ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवरही टीका केली. जाणते राजे वगैरे कुणीही नाहीत असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता उदयनराजेंनी टीका केली आहे. तर उद्धव ठाकरेंना शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे. निदान त्यांनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार तरी आठवावेत आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी चांगलाच गदारोळ झाला. या पुस्तकावर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनीही टीका केली. तसंच हे पुस्तक मागे घ्या असंही या तिन्ही पक्षांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपाने मात्र आपला पुस्तकाशी काहीही संबंध  नाही असं म्हटलं आहे. तर उदयनराजे भोसले यांनी या पुस्तकाबाबत भूमिका मांडत असताना उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

Share this to: