मोदींची शिवरायांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावर त्वरीत बंदी घाला; पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसची मागणी

पिंपरी, दि. १३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपकडून नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी तुलना करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. अशी तुलना करणाऱ्या पुस्तकावर त्वरीत बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसने केली आहे.

यासंदर्भात युवक काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची शिवरायांशी तुलना करण्याचा प्रयत्न केला होता, आता त्याचाच पुढचा भाग म्हणजे ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ हे पुस्तक आहे. हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणाऱ्या नरेंद्र मोदी यांची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. नरेंद्र मोदी मात्र जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहेत. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही.

शिवस्मारकातही घोटाळा करणाऱ्या भाजपला खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपच्या या खोडसाळपणाचा युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. भाजपने त्वरित महाराष्ट्राची जाहीर माफी मागून या पुस्तकावर बंदी न घातल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.”

या निवेदनावर युवक काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा अध्यक्ष नासीर चौधरी यांच्या सह्या आहेत.

Share this to: