सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणार; बारामतीत जंगी स्वागतानंतर अजित पवारांची घोषणा

बारामती, दि. १० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार प्रथमच शुक्रवारी बारामतीत आले होते. त्यांचे बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केले. आपण या स्वागताने भारावून गेल्याचे पवारांनी भाषणात सांगितले. या सत्कारानंतर अजित पवार यांनी केलेल्या भाषणात राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करणार असल्याची घोषणा केली आहे.

अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत, मग ती कोणत्याही माध्यामाची शाळा असो, आम्ही तिथे मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमधल्या इतर नेत्यांचाही याला पाठिंबा आहे.’

अजित पवार आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘ज्यांनी मला प्रचंड मतदान केलं, त्यांचा हा सत्कार आहे. १ लाख ६५ हजारांचं मताधिक्य विधानसभेला मिळणं ही मोठी गोष्ट आहे. एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी दिलं. मी भारावून गेलो आहे. हा सर्व बारामतीकरांनी केलेला नागरी सत्कार आहे. हा एकट्या अजित पवारांचा सत्कार नाही. हा इथल्या घराघरातल्या प्रत्येकाचा सत्कार आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘बारामती हे एक कुटुंब आहे. शरद पवार साहेबांनी १९६७ पासून राजकारणात काम करायला सुरुवात केलं. त्यांनी अनेकांना मोठं केलं. पदं दिली. आपण सारे एका घरातल्याप्रमाणे आहोत, हीच शिकवण आम्ही पवार साहेबांकडून घेतली आहे.’

‘सत्काराला सर्व जातीधर्माचे लोक रस्त्यावर आले होते. खूप आठवणी डोळ्यांसमोरून गेल्या. काही शाळेतले मित्र भेटले. वडीलधारे आशीर्वाद देत होते. अनेकांना धक्काबुक्की, त्रास झाला. त्याबद्दल दिलगीरी मी व्यक्त करतो. आता पाच वर्षांत खूप काम करायचं आहे. पुणे जिल्ह्यात दौंड सोडून सर्व भागातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं. जनतेनं जे काम केलं, त्याला तोड नाही,’ असं पवार म्हणाले.

चार दिवस सासुचे..चार दिवस सुनेचे

पवार म्हणाले, ‘दिवस बदलत असतात. चार दिवस सासुचे आले, तर चार दिवस सुनेचे देखील येतात. विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं काम करावं लागणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न आम्ही मार्गी लावत आहोत. बारामतीतल्या आणि राज्यातल्या अन्य सर्व शहरांमधील पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवणार आहोत. त्यांची घरं चांगली करणार. समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला कशाप्रकारे मदत होईल, हे आम्ही पाहू. बारामतीकरांनी जंगी सत्कार केला. साडेतीन शक्तीपीठांमधून प्रसाद आला. सर्व तीर्थस्थळांमधून आशीर्वाद मिळाले. या आशीर्वादाच्या जोरावर महाविकास आघाडीच्या निमित्तानं चांगलं काम करायचं आहे, अशी हमी पवारांनी बारामतीकरांना दिली.

Share this to: