पिंपरी-चिंचवडमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांचा मिळकतर माफ; महापालिकेच्या महासभेत भाजपचा निर्णय

पिंपरी, दि. १० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांना कोणताही मिळकतकर न आकारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (दि. १०) घेण्यात आला. त्याबाबतची उपसूचना सभेत मंजूर करण्यात आली. परंतु, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी या उपसूचनेला जोरदार विरोध केला. त्यांचा विरोध नोंदवून उपसूचनेला मंजुरी देण्यात आली.

महापौर माई ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. भाजप नगरसेवक नामदेव ढाके यांनी शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांचा मिळकतर माफ करण्याची उपसूचना मांडली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. ही उपसूचना विषयाशी सुसंगत नसल्याचा आक्षेप या नगरसेवकांनी घेतला. महापौर माई ढोरे यांनी विरोधकांचा विरोध नोंदवून उपसूचनेला मंजुरी दिली. त्यामुळे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षापासून पिंपरी-चिंचवडमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कोणताही कर न आकारण्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

याबाबतचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. मुंबई महापालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मिळकतर माफ करण्यात आला आहे. त्याला राज्य सरकारने मान्यताही दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतलेल्या निर्णयालाही राज्य सरकारकडून मान्यता मिळेल, अशी आशा आहे.

यासंदर्भात महापौर माई ढोरे म्हणाल्या, “शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांचा मिळकतकर माफ करण्यात यावा यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचना मांडून ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांना कोणताही मिळकतकर न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा शहरातील हजारो मिळकतधारकांना फायदा होणार आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाला राज्य सरकारने अंतिम मान्यता द्यावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे माई ढोरे यांनी सांगितले.”

Share this to: