जेएनयुमध्ये हल्ला करणाऱ्यांपैकी काही जणांची ओळख पटली; लवकरच उलगडा होणार

नवी दिल्ली, दि. ८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तोंड बांधून आलेल्या काही गुंडांनी धुडगूस घातला. त्यानंतर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई मागणी होत असताना दिल्ली पोलिसांना काही हल्लेखोरांची ओळख पटवण्यात यश आले आहे.

तीन दिवसांपूर्वी जेएनयूमध्ये विद्यापीठातील प्राध्यापकांनी शांतता बैठक आयोजित केलेली असताना रूमालानं तोंड बांधून आलेल्या गुंडांनी विद्यापीठात हैदोस घातला. विद्यार्थी, प्राध्यापकांना लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी मारहाण करत त्यांनी विद्यापीठातील साहित्याचंही प्रचंड नुकसानं केलं होतं. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेषी घोष हिच्यासह प्राध्यापक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेचे अजूनही पडसाद उमटत असून, हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

देशभरात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं होत असतानाच जेएनयूमध्ये हल्ला करणाऱ्यांपैकी काहींची ओळख पटली आहे. दिल्ली पोलिसांना हल्लेखोरांची ओळखण्यात यश आलं असून लवकरच या घटनेवरील पडदा दूर होणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेषी घोष हिने या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी संघटना(अभाविप) असल्याचा आरोप केला होता. मात्र, अभाविपनं हे आरोप फेटाळून लावले. डाव्या विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी या हिंसाचारामागे असल्याचं अभाविपनं म्हटलं होतं. दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी आयेषी घोष आणि इतर १९ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर जेएनयूमधील सर्व्हर रूमची तोडफोड करण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनयू प्रशासनानं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

Share this to: