कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील कामगारांची वज्रमुठ; भारत बंदमध्ये सहभाग

पिंपरी, दि. ८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कामगारहितांऐवजी भांडवलदारांना पूरक कायदे केले जात असल्याच्या विरोधात देशातील विविध कामगार संघटनांनी बुधवारी (आज) बंद पुकारला आहे. पिंपरी-चिंचवडमधील विविध कामगार संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. कामगारांनी सकाळी दुचाकी रॅली काढून पुढे वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.

कंत्राटी कामगार कायदा, ‘निम’ कायदा, लर्न ॲण्ड अर्न असे कायदे कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करणारे आहेत. तसेच २०१६ मध्ये केंद्र सरकारने लागू केलेला ‘एनसीएलटी’ (NATIONAL COMPANY OF LAW TRIBUNAL) कायदा रद्द करुन पुर्वीचाच ‘बीआयएफआर’ (BEAURO OF INDUSTRIAL FINANCIAL RESTRUCTCURE) हा कायदा अंमलात आणावा. या व इतर मागण्यांसाठी बुधवारी सर्व संघटीत, असंघटीत कामगारांनी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारला होता.

या संपात देशभरातील बारा राष्ट्रीय कामगार संघटनांसह इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, एआययूटीसीयू, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटी यूसी या संघटना सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. पिंपरी-चिंचवडमध्येही हा संप पाळण्यात आला. मात्र त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाली. शहरातील कामगारांनी सकाळी दुचाकी रॅली काढली. त्यामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, कामगार नेते इरफान सय्यद, इंटकचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग गडेकर, कामगार नेते माधव रोहम, अनिल रोहम तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सरकारी, निमसरकारी, केंद्र व राज्य सरकारच्या अंगीकृत आस्थापनातील कर्मचारी आणि पिंपरी चिंचवड, भोसरी, तळेगाव, लोणावळा, चाकण, राजगुरुनगर औद्योगिक पट्यातील कामगार सहभागी झाले होते. पुण्यातील वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.

Share this to: