महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मंगळवारी रहाटणीत निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

चिंचवड, दि. २३ (प्रतिनिधी) – वस्ताद विष्णूबुवा नखाते प्रतिष्ठान व पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या  वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील कुस्तीगीरांची निवड चाचणी स्पर्धेचे मंगळवारी (२४ डिसेंबर २०१९) रहाटणी येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवड स्पर्धेचे आयोजक व प्रभाग स्वीकृत सदस्य संदिप नखाते आणि पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे यांनी दिली.

रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता या निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेचे आखाडा पूजन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते केले जाणार आहे. पुढच्या महिन्यात बालेवाडी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. निवड चाचणी स्पर्धेत विजयी कुस्तीगीर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरतील. निवड चाचणी स्पर्धेसाठी मंगळवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत कुस्तीगीरांची वजने घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा कुमार गट, माती गट व गादी गटात होणार आहे.

या निवड चाचणी स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. त्यानुसार यावर्षीचा कुस्ती जीवन गौरव पुरस्कार वस्ताद सुरेश पंढरीनाथ बारणे यांना देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. स्पर्धेचे बक्षिस वितरण रात्री ९ वाजता केले जाणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष हनुमंत गावडे, पिंपरी-चिंचवडमधील प्रथम एनआयएस कुस्ती कोच किशोर नखाते, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे खजिनदार दिलीप बालवडकर, मुख्य संघटक धोंडीबा लांडगे, विजय गावडे, निमंत्रक हभप भानुदास नखाते, राष्ट्रीय कुस्ती पंच विजय नखाते, माजी स्वीकृत नगरसेवक सखाराम नखाते, नंदकुमार नखाते, मारूती नखाते, प्रदीप नखाते, कुलदीप नखाते, शुभम नखाते व रहाटणीचे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

Share this to: