देशातील टॉप 100 सेलिब्रिटींमध्ये विराट कोहली अव्वल, अक्षय कुमारचा दुसरा क्रमांक सलमान तिसर्‍या स्थानावर घसरला

नवी दिल्ली, दि. १९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – फोर्ब्स इंडियाने 2019 च्या सेलिब्रिटी 100 ची वार्षिक यादी जाहीर केली आहे आतापर्यंत बॉलिवूड दिग्गजांचा दबदबा असलेल्या फोर्ब्स सेलिब्रिटी 100 च्या यादीमध्ये प्रथमच एखाद्या खेळाडूने अव्वल स्थान मिळवले आहे. अंदाजे कमाई आणि प्रिंट-सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या आधारे टॉप 100 सेलिब्रिटींची निवड केली गेली.

252.72 कोटी रुपये वार्षिक कमाईसह क्रिकेटपटू विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. यात त्याची मॅच फी, बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, ब्रँड अ‍ॅन्डोर्समेंट आणि प्रत्येक प्रायोजित इन्स्टाग्राम पोस्टवरील 8 अंकी फी समाविष्ट आहेत. 2018 मध्ये त्याला आयसीसीने क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडले होते.

बॉलिवूडमधील अक्षय कुमारने दुसरे स्थान पटकावले. त्याची एकुण कमाई 293.25 कोटी इतकी आहे. 2019 च्या फोर्ब्स यूएस वर्ल्डच्या सर्वाधिक पेड सेलिब्रिटींच्या यादीतील हा एकमेव भारतीय आहे. यंदा सलमान खानला तिसरा क्रमांक मिळाला असून त्याच्या कमाईचा आकडा 229.25 कोटी इतका आहे.

प्रथमच पहिल्या 100 मध्ये पोहोचले

टॉप 100 लिस्टमध्ये सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार आणि विकास खन्ना यांनी प्रथमच स्थान पटकावले. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कल्की कोचलीन (93वी रँक) आणि सैफ अली खान (74 वी रँक) यांनीही या यादीत स्थान मिळविले. दिव्या जे शेखर, नंदिका त्रिपाठी, नैनी ठाकर, पंक्ती मेहता कडकिया, प्रणित सारडा, सलील पांचाल आणि वर्षा मेघानी यांनी यावेळची यादी अंतिम केली.

यंदाच्या यादीची वैशिष्ट्ये

शाहरूख खानने ‘झिरो’ या केवळ एका चित्रपटाच्या रिलीजनंतर पहिल्या 10 मध्ये पुन्हा स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची कमाई 27 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 124.38 कोटींवर गेली आहे. पहिल्यांदा पहिल्या दहामध्ये दोन महिलांचा समावेश झाला आहे. आलिया भट आठव्या आणि दीपिका पादुकोण दहाव्या क्रमांकावर आहेत. दिशा पटनी (43 वी रँक), क्रिती सॅनन (38 वी रँक) आणि सारा अली खान ( 66 वी रँक) पहिल्यांदा टॉप 100 यादीत समाविष्ट झाल्या आहेत.

Share this to: