रावेत येथील नदीपात्रातील कचरा ताबडतोब उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकू; राष्ट्रवादीचा इशारा

चिंचवड, दि. १६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कात्रज बाह्यवळण महामार्गावर रावेत उड्डाणपूलाखाली नदीपात्रात अनेक दिवसांपासून कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा ताबडतोब उचलावा व कचरा टाकणाऱ्या संबधित ठेकेदारांवर किंवा जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी स्थायी समिती माजी सभापती प्रशांत शितोळे, महिला आघाडी शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, बनसोडे, नगरसेविका माई काटे, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे यांच्यासह युवक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विशाल वाकडकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “रावेत जलउपसा केंद्राच्या वरच्या टप्प्यात कचरा टाकण्यात येत आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त अस्वच्छ पाणी नदीपात्रात मिसळत आहे. तेच दुषित पाणी रावेत जलउपसा केंद्रातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उचलले जाते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी वाढलेल्या झाडाझुडूपांमध्ये कचरा अडकलेला आहे. तो काढून तातडीने नदीपात्र स्वच्छ करावे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिवसाढवळ्या रोज कचऱ्याचे डंपर येथे खाली होत आहेत. याकडे अजूनही संबंधित अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही? याबाबतही येथील नागरिकांमध्ये संताप आहे. हा कचरा ताबडतोब न उचलल्यास दोन दिवसांनतर तो आयुक्तांच्या कक्षात आणून टाकण्याचा इशारा वाकडकर यांनी दिला आहे.”

Share this to: