“रेप सीन करुन दाखव”; अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनदरम्यानचा धक्कादायक प्रसंग

मुंबई, दि. १५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षी #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. अनेकांनी त्याचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांवरही आरोप करण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये तसं पाहायला गेलं तर अनेक वेळा कास्टिंग काऊचच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना ‘उजडा चमन’च्या एका अभिनेत्रीसोबत झाली असून तिने तिची आपबीती सांगितली. अभिनेत्री मानवी गगरुला एका ऑडिशनमध्ये दिग्दर्शकाने रेप सीन करण्यास सांगितल्याचं तिने स्पष्ट केलं.

मानवीने ‘उजडा चमन’ व्यतिरिक्क ‘टीवीएफ ट्रिपलिंग’ आणि ‘फॉर मोर शॉट्स’ या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. काही दिवसापूर्वीच तिने ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या करिअरमधील काही अनुभव शेअर केले. यावेळी तुला कास्टिंग काउचचा अनुभव आला का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने तिचा अनुभव सांगितला.

“कास्टिंग काऊच असं नाही म्हणता येणार पण मला एक गोष्ट आठवते. ऑडिशनच्या वेळी मला एक अनुभव आला होता. मी ऑडिशनसाठी गेले होते. तिथे मला दिग्दर्शकांनी रेप सीन करुन दाखविण्यास सांगितलं होतं. मी ऑडिशनला जेथे गेले होते तिथे आधीपासूनच दोन पुरुष बसले होते. त्यांच्यासह मला रेप सीन करण्यास सांगितला होता. या दिग्दर्शकांचं ऑफिस फार विचित्र होतं. विशेष म्हणजे या ऑफिसमध्ये एक बेडही होता”, असं मानवीने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “त्या ऑफिसमधलं वातावरण पाहून मी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे दिग्दर्शकांनी रेप सीनविषयी सांगितल्यानंतर मी घाबरुन तिथून पळून आले”. मानवी नुकताच प्रदर्शित झालेला ‘उजडा चमन’ या चित्रपटामध्ये झळकली. या चित्रपटाव्यतिरिक्त ती लवकरच आयुषमान खुरानासोबत ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

Share this to: