इतिहास उलगडणार; ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा प्रिक्वेल येणार…

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – ‘विंटर इज कमिंग’ म्हणत पहिल्या सीझनपासून सुरू झालेला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेचा प्रवास काही महिन्यांपूर्वी संपला. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या शेवटच्या सीझनबद्दल काहीसा नाराजीचा सूर उमटताना पाहिला मिळाला असला तरी ‘जीओटी’चे फॅन्स मात्र ही मालिका मिस करत आहेत हे नक्की…’गेम ऑफ थ्रोन्स’ या सगळ्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ चा प्रिक्वेल लवकरच चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. या प्रिक्वेलचं नाव ‘हाऊस ऑफ ड्रायगन’ असं असणार आहे.

व्हाईट वॉकर्स आणि त्यांचा सम्राट नाइट किंग यांचा सामना करण्यासाठी जॉन स्नो, डॅनेरीस टारगॅरीयन , आर्या स्टार्क, सान्सा स्टार्क, जेमी लॅनीस्टर, सेर्सी लॅनीस्टर, टायरीयन लॅनीस्टर सगळेच सज्ज होताना आणि या व्हाईट वॉकर्सना गारद करताना आपण सगळ्यांनी पाहिले. परंतु, या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली ही सगळी पार्श्वभूमी ‘हाऊस ऑफ ड्रायगन’ मध्ये दिसणार आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या प्रिक्वेलमध्ये सुमारे ३०० वर्षांपूर्वीची कथा दाखवण्यात येणार आहे. वेस्टेरॉस आणि एसॉस असे दोन भूखंड, त्यांना विभागणारा समुद्र, भिंतीपलीकडे बर्फाच्छादित प्रदेश या सगळ्याच्या इतिहासाच्या प्रिक्वेलची कथा डोकावणार आहे. वेस्टेरॉसमध्ये ‘आयर्न थ्रोन’साठी सुरू असलेल्या या संघर्षाची सुरुवात नेमकी झाली कशी? टारगॅरियन परिवाराचा उदय कसा झाला? व्हाइट वॉकर्स नेमके कोण होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तर या प्रिक्वेलमध्ये मिळणार आहे. त्यामुळे या प्रिक्वेलबाबतची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.

१७ एप्रिल २०११ रोजी अमेरिकेतील एचबीओ या वाहिनीवर ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. त्यानंतर लेखक जॉर्ज आर आर मार्टिन यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर चाहत्यांना खिळवून ठेवले. २००५ मध्ये एच.बी.ओ. चॅनेलने मार्टिनची भेट घेऊन ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्टिनच्या मार्गदर्शनाखाली डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वीस या दोघांनी मिळून ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका लिहिण्यास सुरुवात केली.

१९९१ च्या सुमारास जॉर्ज आर. आर. मार्टिन यांनी ‘अ साँग ऑफ आइस अँड फायर’ ही कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये त्यातली पहिली कादंबरी ‘अ गेम ऑफ थ्रोन्स’ या नावाने प्रकाशित झाली. त्यानंतर कालांतराने इतर कादंबऱ्या येत गेल्या.

Share this to: