भोसरी मतदारसंघात सत्ताधाऱ्यांना पराभव दिसतोय म्हणून विलास लांडेंविरोधात अफवा पसरवित आहेत – विराज लांडे

भोसरी, दि. १८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भोसरी विधानसभा मतदारसंघात लाखाचे लीड घेण्याची बतावणी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता मतदारसंघातूनच मोठा विरोध होत आहे. या निवडणुकीत आपला निवडणुकीत पराभव होणार हे स्पष्ट दिसू लागल्याने मतदारसंघातील सत्ताधारी सैरभैर झाले आहेत. त्यातून अगदी खालच्या थराला जाऊन आता सोशल मीडियावर अफवा पसरवू लागले आहेत. परंतु, मतदारसंघातील जनतेने दादागिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कायमचे घरी बसविण्याचा निर्धार केलेला आहे. मतदारसंघातील मतदार विलास लांडे यांना विजयी करून दादागिरीला धडा शिकविणार आहे, असा टोला युवा नेते विराज लांडे यांनी लगावला आहे.

यासंदर्भात विराज लांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “भोसरी विधानसभा मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांकडून अपक्ष उमेदवार व माजी आमदार विलास लांडे यांच्याविषयी सोशल मीडियावर अफवा पसरविण्याचे प्रकार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी विलास लांडे यांचा कार्यकर्ता मतदारांना पैसे वाटत असल्याची अफवा सत्ताधाऱ्यांकडून पसरविण्यात आली होती. कार्यकर्ता पकडला गेला असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र या प्रकरणात कोणत्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नाही.

प्रचारादरम्यान विलास लांडे यांना प्रत्येक ठिकाणी मतदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच त्यांची जनमानसात प्रतिमा मलिन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवण्याचा जाणूनबुजून प्रकार केला. आता विलास लांडे यांनी मतदारांना पैसे वाटण्यासाठी दोन कंपनीतील काही कामगारांवर दबाव टाकल्याची अफवा पसरविण्यात आली आहे.. सोशल मीडियावर असे मेसेज पसरवून सत्ताधाऱ्यांनी एक प्रकारे आपला पराभव मान्यच केलेला आहे. राजकारणात पायाखालची वाळू सरकली की असे उद्योग सुचतात. ते आता भोसरी मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांना सुचले आहे.

या सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत काहीच कामे केली नाहीत. दहशत आणि गुंडगिरी करण्यापलीकडे त्यांना सर्वसामान्यांची काही कामे करता आली नाहीत. दुसऱ्यांच्या जागा बळकावून स्वतःचे घर भरले. त्यामुळे मतदारांनी निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याचा ठाम निर्धार केलेला आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळेच आधीची लाखांची बतावणी करून आता सैरभैर पळू लागले आहेत. त्यातून विजयाची पक्की खात्री असलेल्या विलास लांडे यांच्याविषयी अफवा पसरवल्या की मतदार आपल्याकडे वळतील, असा सत्ताधाऱ्यांचा डाव दिसत आहे. परंतु, भोसरी मतदारसंघातील मतदार सुज्ञ असून, विलास लांडे यांना विजयी करूनच अफवा पसरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असा विश्वास विराज लांडे यांनी व्यक्त केला आहे.”

Share this to: