भोसरी मतदारसंघात विलास लांडे यांच्या सभेला विराट जनसमुदाय उपस्थित; लांडे यंदा मैदान मारणार

पिंपरी, दि. १८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ भोसरीच्या गावजत्रा मैदानावर गुरूवारी (दि. १८) रात्री झालेल्या सभेला विराट जनसमुदाय उपस्थित होता. या मतदारसंघाच्या निवडणुकीत लांडे यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केल्याचे सभेच्या गर्दीवरून स्पष्ट झाले. सभेला उत्स्फूर्तपणे जमलेल्या गर्दीमुळे लांडे यंदा भोसरीचे निवडणूक मैदान मारणार असेच चित्र मतदारसंघात निर्माण झालेले आहे. लांडे यांना मतदारांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे लांडे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हे फिरलेले वातावरण मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

भोसरी मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे हे यावेळी अपक्ष निवडणूक लढवित आहेत. शहराच्या राजकारणातील अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी अशी ओळख असलेल्या लांडे यांनी निवडणुकीचा अर्ज भरता क्षणीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर मनसेनेही लांडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे मतदारसंघातील कारभाराला कंटाळलेली शिवसेना आणि भाजपच्या नाराजांनीही विलास लांडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांच्या साथीने लांडे यांनी अवघ्या एक आठवड्यात संपूर्ण मतदारसंघातील राजकीय चित्र पालटून टाकले आहे. लांडे यांनी मतदारसंघात झंझावाती प्रचार दौरे करून नागरिकांना गुंडगिरी आणि हफ्तेखोरीपासून संरक्षण देण्याचे वचन दिले.

त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वच भागात झोपडपट्ट्यापासून ते उच्चभ्रू वस्तीपर्यंत लांडे यांना प्रचार दौऱ्यादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिक उघडपणे समोर येत नसले तरी लांडे यांच्या विजयासाठी आतून काम करत आहेत. त्यामुळे लांडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला आहे. लांडे यांच्या प्रचारासाठी गुरूवारी रात्री भोसरीच्या गावजत्रा मैदानावर आयोजित सभेला झालेल्या विराट गर्दीवरून कार्यकर्त्यांमधला उत्साह दिसून आला. या सभेला अभिनेते व राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित राहणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील दौऱ्यामुळे खासदार कोल्हे यांच्या विमान लँडिंगला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ते विलास लांडे यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. नागरिकांनी केलेल्या गर्दीला विलास लांडे आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मार्गदर्शन केले.

लांडे आणि साने या दोघांच्याही सभेला नागरिकांचा होणारा टाळ्यांचा गजर आणि शिट्ट्यांचा पडणारा पाऊस हा भोसरी मतदारसंघात वातावरण फिरलयंचा अनुभव देणारा आहे. या विराट जनसमुदायासमोर भाषण करताना विलास लांडे यांनी विरोधकांचे वस्त्रहरणच केले. लांडे यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडत कोणाच्या केसालाही धक्का लागला तर मी सोबत असल्याचे सांगून नागरिकांना दहशतीला न घाबरण्याचे आवाहन केले. सभेला झालेली गर्दी ही निवडणुकीचे चित्र स्पष्ट करणारी ठरू शकते. भोसरी मतदासंघात विलास लांडे यंदा मैदान मारणारच असे चित्र त्यावरून तयार झाले आहे. ही गर्दी पाहून लांडे यांच्या विरोधकांचे तोंडचे पाणी पळाल्यासारखी स्थिती आहे. तसेच या सभेला झालेली गर्दी ही भोसरी मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता जनता जनार्दन कोणाला कौल देते हे २४ तारखेलाच समजणार आहे.

Share this to: