विलास लांडेंनी जनतेसमोर मांडली महेश लांडगेंची कुंडली; भंगार चोर, करावर दरोडा टाकणारा, हफ्ते गोळा करणारा, मुरूम चोर, जागा बळकावणारा अशा शब्दांत केला हल्ला

पिंपरी, दि. १८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महेश लांडगे यांची कुंडली गुरूवारी (दि. १८) रात्री भोसरीतील सभेत जनतेसमोर मांडली. भंगार चोर असणारा हा आता नागरिकांनी कर म्हणून भरलेल्या पैशांवर दरोडा टाकत आहे. या भंगार चोराला औरंगाबादेत पकडण्यात आले होते. रातोरात जाऊन मी सोडवून आणले. २००२ मध्ये आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मी त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणले. आता त्याला पराभव दिसू लागला आहे. तो रडारडी करणार, बायकोला आणि पोरीला जनतेसमोर आणून रडायला लावणार, त्याची नाटक कंपनी आहे. त्यानेच ढोंग करावे, चोऱ्या पण त्यानेच कराव्यात. हफ्ते पण त्यानेच गोळा करावेत, अशा शब्दांत विलास लांडे यांनी महेश लांडगे यांच्याव घणाघाती प्रहार केला.

भोसरीतील गावजत्रा मैदानावर झालेल्या प्रचार सभेत लांडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मोहिनी लांडे, डॉ. वैशाली घोडेकर, स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक समीर मासुळकर, अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक पंडित गवळी, मोहम्मद पानसरे, जालिंदर शिंदे, सतीश भोसले, गणपत आहेर, सतीश थिटे, संदिपान झोंबाडे, भरत लांडगे, ईश्वर ठोंबरे, दत्ता गव्हाणे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सभेत बोलताना विलास लांडे म्हणाले, “मी हवेली विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन महेश लांडगे यांना नगरसेवकपदी निडून आणले. त्यावेळी मला अजितदादा म्हणाले की हा जकात चोरतो, मारामाऱ्या करतो. नगरसवेक झाला तर महापालिका विकून खाईल. आज तेच झाले आहे. पण मी त्यावेळी माझे नाते जपले. याला औरंगाबादेत भंगार चोरीत पकडण्यात आले होते. मी रातोरात जाऊन याला सोडवून आणले. नाते महत्त्वाचे समजून हे मी सगळे केले. आता ते ज्या ऑफिसमध्ये बसतात, तेही माझेच आहे. मी त्याला नगरसेवक केले. त्याने आत्मचिंतन करावे.

या आमदारांचा व्यवसाय काय आहे. भंगार चोरण्याचा, जागा बळकावण्याचा यांचा व्यवसाय आहे. महापालिकेत नागरिकांनी भरलेल्या करांच्या पैशांवर दरोडा टाकणारा हा आमदार आहे. आता याने मतदारसंघातील मुरूम चोरून विकायचा नवीन धंदा सुरू केला आहे. मतदारसंघातील टपरीवाले, रिक्षावाले आणि बसचालकांकडून हफ्ते गोळा केले जातात. मागे-मागे फिरणाऱ्या हफ्ते गोळा करायला लावतो. तरुणांवर चांगले संस्कार करण्याऐवजी त्यांना वाम मार्गाला लावतो. तू चोऱ्या केल्यास तसे त्यांना शिकवू नको, असा सल्लाही त्यांनी दिला.

आता निवडणुकीत पराभव दिसू लागताच तो रडारडी करणार, बायकोला आणि पोरीला जनतेसमोर आणणार रडायचे नाटक करणार. त्याची नाटक कंपनी आहे. त्यानेच ढोंग करावे, चोऱ्या कराव्या तर त्यानेच कराव्यात, हफ्ते गोळा सुद्धा त्यानेच करावे. संपूर्ण मतदारसंघात दहशत पसरवून ठेवली आहे. पण जनतेने काळजी करण्याचे कारण नाही. कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर विलास लांडे सोबत आहे. येत्या २१ तारखेला कपबशी चिन्हावर मतदान करून ही दहशत, हफ्तेगिरी, भंगारचोरी आणि दादागिरी मतदारसंघातून कायमची हद्दपार करा, असे आवाहन लांडे यांनी मतदारांना केले.”

Share this to: