महेश लांडगे यांच्या चुकीला माफी नाही, पराभव नक्की; दत्ता साने भोसरीच्या गाव जत्रा मैदानावर कडाडले

पिंपरी, दि. १७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भोसरी मतदारसंघाच्या आमदाराचा धंदा काय? एवढे पैसे आणले कोठून?, दीड कोटींची गाडी कुठून आली?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजप उमेदवार महेश लांडगे यांच्यावर गुरूवारी (दि. १७) जोरदार हल्लाबोल केला. माझे ऑफिस फोडणाऱ्यांनी दम असेल तर थेट माझ्याशी भिडावे. मी चार-चौघांना नाही तर एकटाच फिरत असतो, असे आव्हानही साने यांनी आमदार लांडगे यांचे नाव न घेता दिले. यांनी लोकांच्या मुंड्या मुरगळून स्वतःचे घर भरले आहे. लोकांच्या जागा बळकावून हे पैसे कमवित आहेत. त्यांनी पाच वर्षात चूक केली, त्यांच्या चुकीला माफी नसल्याचे सांगत दत्ता साने यांनी महेश लांडगे यांचा पराभव नक्की असल्याचे सांगितले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

दत्ता साने म्हणाले, “मागील निवडणुकीत यांच्या खोट्या प्रचाराला, खोट्या आश्वासनाला बळी पडून दैवतासारखे असलेल्या विलास लांडे यांच्या विरोधात काम केले. ती माझ्याकडून चूक झाली. त्यासाठी मी विलास लांडे यांची जाहीर माफी मागतो. आताच्या आमदाराला मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मदत करण्याचा पवित्रा घेतला. मात्र आता मला पश्चात्ताप होत आहे. त्याचे प्रायश्चित करण्यासाठी व हिशोब चुकता करण्यासाठी निवडणुकीत विलास लांडे यांना निवडून आणणार आहे. या आमदारामुळे महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. महापालिकेला यांनी चराऊ कुरण बनविले आहे. फक्त यांचे घर भरण्याचे काम सरू आहे.

हेच आमदार महापालिकेत स्थायी समितीचे सभापती असताना भोसरी उड्डाणपुलाजवळ शीतलबाग येथे ७० लाखाचे पादचारी पूल साडेसात कोटी रुपयांना उभारण्यात आले. मोशीत वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात एका माजी पालकमंत्र्यांच्या नातेवाईकाची आणि या आमदाराची डील झाली आहे. त्यातून ५० कोटी रुपये लुटले जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेची कामे तीनच ठेकेदारांना वाटून यांनी टक्केवारी खाल्ली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना तळवडेत डिअर पार्क प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र यांनी मोशीत सफारी पार्क करण्याचे गाजर जनतेला दाखविले आहे. ते तीन भाऊ आहेत. त्यातील एकजण कामाला जातो. दुसरा काय करतो ते तुम्हाला माहिती आहे. तिसरा आमदार आहे. यांचा काय धंदा आहे?, कुठून पैसे आणले यांनी?, यांच्याकडे दीड कोटींची गाडी आली कोठून? सामान्यांचे मुंडकु मुरडून हे सर्व आणले आहे

चऱ्होलीत ९० मीटरचा रोड ९० कोटींना बनविला जात आहे. हा सोनेरी रोड बनविला जात आहे. हे आमदार एवढा भ्रष्टाचार करत आहेत की किती खायचे याचे भान त्यांना राहिलेले नाही. जाताना हे उरावर घालून घेऊन जाणार आहे का?, असा सवाल त्यांनी केला. अपक्ष उमेदवार विलास लांडे हे आमदार असताना त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे या महापौर होत्या. त्यावेळी लांडे यांनी महापालिकेत येऊन कधी कोणाकडे चिरीमिरी मागितल्याचे आम्ही ऐकले सुद्धा नव्हते. आजची परिस्थिती एक गेला की दुसरा आला, तो गेला की तिसरा आला तो गेल्यानंतर चौथा येतो आणि गोळा करून जातो, असा कारभार सुरू आहे. महापालिकेच्या बांधकाम प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. सध्याचा बांधकाम दर १८५० रुपये असताना हे मात्र २८०० ते ३८०० रुपये दराने बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देत आहेत. केवढा मोठा भ्रष्टाचार आहे हा. सामान्यांच्या खिशातला पैसा लुटला जात आहे.

चऱ्होली परिसरात तर अक्षरशः लूटमार सुरू आहे. विकासकामांच्या नावाखाली तेथील शेतकऱ्यांना व बिल्डरांना लुटले जात आहे. एकाच्या नावाखाली हे सर्व सुरू आहे. विजेचे मीटर देतानाही कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात आहे. यांनी अक्षरशः कहर केला आहे. यांनी चूक केली आहे आणि नागरिक चुकीला माफी देणार नाहीत. आमदाराच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आता मतदारांना पैसे वाटू लागले आहेत आणि चोराच्या उलट्या बोंबा त्याप्रमाणे आम्ही पैसे वाटल्याचे सांगत आहेत. अपक्ष उमदेवार माजी आमदार विलास लांडे यांनी कधी कोणाच्या मुंड्या मुरगळल्या नाहीत, हफ्ता मागितला नाही, भ्रष्टाचार केला नाही. मात्र आताच्या आमदाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या आमदाराची फडफड सुरू आहे. या निवडणुकीत गर्वाचे घर खाली नक्की होईल आणि अपक्ष उमेदवारी माजी आमदार विलास लांडे हे नक्की निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

Share this to: