आमदार लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे चिंचवड मतदारसंघातील मतदारांना आवाहन

पिंपरी, दि. १७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला असून, त्यांनी हे प्रश्न सोडविले आहेत. काही प्रलंबित प्रश्न कायदेशीर अडचणींमुळे सुटण्यास उशीर होत आहे. पण हे प्रश्न सुद्धा फक्त अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. त्यासाठी जगताप यांनी पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे. चिंचवड मतदारसंघातील जनता महायुतीचे उमेदवार आमदार जगताप यांच्या विकासात्मक नेतृत्वाचा अनुभव घेतलेली जनता आहे. या जनतेने आमदार जगताप यांना राज्यातील क्रमांक एकचे मताधिक्य देऊन प्रचंड मोठा विजय त्यांच्या झोळीत टाकावा, असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. तसेच मतदारसंघातील प्रत्येक शिवसैनिक आमदार जगताप यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त थेरगावमध्ये बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, “विकासाच्या बाबतीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ कायम अग्रेसर राहिला आहे. मतदारसंघात झालेले अनेक मोठे प्रकल्प, सुरू असलेली कामे यांमुळे या मतदारसंघाचे सर्वांना आकर्षण वाटत आहे. आमदार जगताप यांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले आहे. मतदारसंघातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक महत्त्वाचे बीआरटीएस रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे अभियंते, कर्मचारी व कामगारांची चिंचवड मतदारसंघात राहण्यासाठी पसंती असते. या सर्वांना आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे म्हणून मतदारसंघात चांगले रस्ते तयार करण्यात आले आहेत.

पुणे शहरातून हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते प्रशस्त करून चिंचवड मतदारसंघाने उद्योग वाढीला चालना दिली आहे. मतदारसंघात वाहतूककोंडी होणाऱ्या ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर उभारून नागरिकांचा प्रवास विनाअडथळा व जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची वेळेसोबतच इंधनाचीही बचत झाली आहे. आमदार जगताप हे मतदारसंघात मेट्रो प्रकल्प आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. त्याला यश देखील आले आहे. दापोडी ते निगडी मार्गावर मेट्रोचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे. लवकरच चाकण ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग मंजूर होऊन कामाला प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. आमदार जगताप चिंचवड मतदारसंघासोबतच शहराच्या अन्य भागात सुद्धा रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आग्रही राहिले आहेत.

शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण कमी व्हावे, रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी, रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे आणि नागरिकांना मुबलक व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आमदार जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि कामे मार्गी लागली आहेत. त्यांनी आमदारपदाचा वापर फक्त मतदारसंघाच्या विकासासाठीच केला आहे. आता मतदारसंघाचा शास्वत विकास होणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटी, नदी सुधार, झोपडपट्ट्यांचा शास्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी लक्ष्मण जगताप हेच आमदार असणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी मतदारसंघातील मतदारांनी लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य देऊन विधानसभेवर पाठवावे, असे आवाहन बारणे यांनी केले.”

Share this to: