चिंचवड मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर दोन दिवसांत कारवाई – श्रीरंग बारणे

पिंपरी, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – विधानसभा निवडणुकीसाठी शिवेसना आणि भाजप आणि मित्र पक्षांची महायुती झाली आहे. जागा वाटपात भोसरी आणि चिंचवड भाजपला, तर पिंपरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. पक्षाच्या आदेशानुसार या तीनही मतदारसंघात महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. या मतदारसंघांमध्ये बंडखोरी केलेल्या शिवसेना आणि भाजपच्या बंडोबांवर दोन्ही पक्षाचे नेते लवकरच कारवाईचा निर्णय घेतील. चिंचवड मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर पक्षामार्फत येत्या दोन दिवसांत कारवाई होईल, अशी माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि. ९) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व आमदार महेश लांडगे, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व आमदार गौतम चाबुकस्वार, भाजप खासदार अमर साबळे यांच्यासह भाजप, शिवसेनेसह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, “महायुतीचे जागा वाटप निश्चित झाले असूनही काही अतिउत्साही लोकांनी पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी केली आहे. या बंडोबांना जनता भीक घालणार नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली असली, तरी त्यांना पक्षाने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. त्यांच्यावर येत्या दोन दिवसांत निश्चितपणे कारवाई होईल. चिंचवड मतदारसंघातील शिवसैनिक महायुतीचे उमेदवार व आमदार लक्ष्मण जगताप यांचाच प्रचार करणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित आहे. त्यांना मताधिक्य किती मिळणार याचीच आता मतदारसंघाला उत्सुकता लागलेली आहे. जगताप यांना दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

Share this to: