चिखलीत दसऱ्यानिमित्त भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन; अपक्ष उमेदवार विलास लांडेंना चिखलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भोसरी, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – दसऱ्यानिमित्त चिखली, साने चौक येथे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विलास लांडे व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या हस्ते विरोधकांची गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या रावणाचे मंगळवारी (दि. ८) रात्री दहन केले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रचंड जनसमुदायाने भोसरी विधानसभा मतदारसंघात आता बदल हवाच, असा नारा यावेळी दिला. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. चिखली भागातील नागरिक विलास लांडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लांडे यांनी या निवडणुकीत चुकीच्या प्रवृत्तींना गाडून भोसरी विधानसभा मतदारसंघाला भयमुक्त करावे, अशी मागणी साने यांनी केली.  

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वतीने दरवर्षी दसऱ्यानिमित्त चिखलीमध्ये रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे यंदाच्या वर्षी चिखलीत होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दत्ता साने यांनी आमदार महेश लांडगे यांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे ते रावण दहन कार्यक्रमात काय वेगळी शक्कल लढवतात याबाबत उत्सुकता होती. दत्ता साने यांनी चिखलीतील साने चौकात हटके पद्धतीने रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारसंघाचे लक्ष वेधले.

साने यांनी भोसरी मतदारसंघात वाढलेली गुंडगरी आणि भ्रष्टाचार यावर आधारित रावण दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मतदारसंघातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, गुंडगिरी, रेडझोन, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला सुरक्षा तसेच चला भोसरीकर जागे होऊया, भयमुक्त भोसरीसाठी एकत्र येऊया, असे लिहिलेले फलक रावणाच्या पुतळ्याला लावण्यात आले होते. त्याचे भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या हस्ते दहन करण्यात आले.

या रावण दहन कार्यक्रमाला चिखलीकरांनी अलोट गर्दी केली होती. या गर्दीने विलास लांडे यांचे जल्लोषात स्वागत केले. भोसरी मतदारसंघात गुंडगिरी वाढली आहे की नाही असा थेट प्रश्न विलास लांडे यांनी नागरिकांना केला. उपस्थित प्रचंड जनसमुदायाने “होय” असे उत्तर दिले. तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघात आता बदल हवाच, असा नारा जनसमुदायाने दिला. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चिखलीकर विलास लांडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. लांडे यांनी या निवडणुकीत मतदारसंघातील चुकीच्या प्रवृत्तींना कायमचे घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केली.

Share this to: