कोथरूड मतदारसंघातील ब्राह्मण महासंघाचे बंड थंड; चंद्रकांत पाटील यांना दिलासा

पुणे, दि. ७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावे लागलेले भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. पाटील यांच्या विरोधात निवडणूक अर्ज दाखल करणारे परशुराम सेवा संघाचे उमेदवार सत्यजीत देशपांडे यांनी अखेर माघार घेतली आहे. तर, ब्राह्मण महासंघानेही पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

कोथरूड मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. भाजपकडून गेली पाच वर्षे मेधा कुलकर्णी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होत्या. मात्र, यावेळी कुणाच्या ध्यानीमनी नसताना इथं चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. पाटील यांचं नाव जाहीर होताच इथं नाराजी उफाळून आली. मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आलं असलं तरी येथील ब्राह्मण संघटनांनी बंडाचा आवाज बुलंद केला होता.

‘दूरचा नको, घरचा उमेदवार हवा’ अशी पोस्टरबाजी करून पाटील यांना विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कोथरूडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ब्राह्मण व्यक्तीला मिळावी, हाच यामागचा उद्देश होता. यातूनच परशुराम सेवा संघाचे सत्यजीत देशपांडे व ब्राह्मण महासंघाचे मयुरेश अरगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

पाटील यांनी मतदारसंघात ठाण मांडून या उमेदवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं बंडखोरांचे मन वळवणे आवश्यक होते. त्यात पाटील यांना काही अंशी यश आलं आहे. परशुराम सेवा संघाच्या प्रतिनिधींसोबत आज झालेल्या बैठकीनंतर सत्यजीत देशपांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारानं ही बैठक झाली. त्यामुळं पाटील यांची चिंता दूर झाली आहे.

जातीच्या मुद्द्यावरून ब्राह्मण संघटनांच्या काही उमेदवारांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले असले तरी या संघटनांमध्येही एकवाक्यता नाही. तसंच, या संघटना म्हणजे संपूर्ण ब्राह्मण समाज नव्हे अशी भूमिका ब्राह्मण समाजातील काही नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळं एखादा उमेदवार अखेरपर्यंत रिंगणात राहिला तरी त्यांच्या बंडाचा कितपत परिणाम होईल, याबाबत साशंकता आहे.

Share this to: