पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने जातीयवादी पक्षातल्यांना पुरस्कृत उमेदवार केल्यास आम्हाला गृहित धरू नये – काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे

पिंपरी, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने नक्की कोणता उमेदवार दिला आहे, याबाबत संदिग्धता आहे. कॉंग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने चिंचवड व भोसरी मतदारसंघात परस्पर ‘पुरस्कृत’ उमेदवार जाहिर करू नये. तसेच परस्पर उमेदवार जाहीर करून कॉंग्रेसला गृहित धरु नये. ज्यांची पूर्वाश्रमीची वाटचाल आणि भविष्यातील वाटचाल जातीयवादी पक्षांच्या जवळ जाणारी आहे. अशांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केल्यास कॉंग्रेस कदापिही पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी जाहीर केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (दि. ६) पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, सुदाम ढोरे, अनूसचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरकडे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, मयूर जैसवाल, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगुटमल, मकरध्वज यादव, सुंदर कांबळे, शितल कोतवाल आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची प्राधिकरणात बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबात शहरात राष्ट्रवादीकडून सुरु असणाऱ्या घडामोडींविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सचिन साठे म्हणाले, “कॉंग्रेसची भूमिका नेहमी जातीयवादी पक्षांविरूद्ध लढण्याची आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसची विचारधारा मानणारा मोठा वर्ग आहे. मागील काळात विरोधकांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेसने वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहे. लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांच्या अर्जावर मी सूचक म्हणून सही केली होती. त्यावेळी सर्व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पार्थ पवारांचा व खासदार अमोल कोल्हे यांचा प्रचार केला होता. आताही आघाडीचा धर्म पाळावा असा कॉंग्रेस वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे. परंतु ‘पुरस्कृत’ उमेदवाराला मदत करा, असा आदेश नाही. शहरात कोणताही उमेदवार पुरस्कृत करण्या अगोदर राष्ट्रवादीने कॉंग्रेसशी संवाद साधायला हवा. स्थानिक पातळीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांशी व वरिष्ठ पातळीवर वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने कोणत्याच मतदारसंघात उमेदवार पुरस्कृत करू नये. परस्पर पुरस्कृत केल्यास राष्ट्रवादीने कॉंग्रेसला गृहित धरु नये, असा इशारा सचिन साठे यांनी दिला आहे.”

Share this to: