देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी युवकांनी पुढे यावे – खासदार पूनम महाजन

चिंचवड, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पुढच्या पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला महत्वपूर्ण योगदान द्यावे लागेल. त्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व खासदार पूनम महाजन यांनी केले.

पूनम महाजन यांनी शनिवारी (दि. ५) ‘कॉफी विथ यूथ’ या कार्यक्रमात शहरातील युवकांशी संवाद साधला.े पिंपळेसौदागर येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश सदस्या उमा खापरे, महेश कुलकर्णी, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नगरसेवक रवी लांडगे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, बाबा त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, नगरसेविका सुनीता तापकीर, निर्मला कुटे, भाजयुमोचे शहर सरचिटणीस व कार्यक्रमाचे संयोजक दिपक नागरगोजे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांविषयी व पक्षाच्या आगामी ध्येयधोरणांविषयी माहिती दिली. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व युवकांना देशावर प्रेम करण्याच्या विचारधारेशी जोडणे आवश्यक आहे. भारताचा सुवर्णकाळ येत आहे. या सुवर्णकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर युवकांना जोडले जाणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस हे युवकांना संधी देणारे मुख्यमंत्री आहेत. त्याचा लाभ घेऊन युवकांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे.

रवि लांडगे प्रस्ताविक करताना म्हणाले, “भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी स्नेहाचे संबंध होते. दिवंगत अंकुश लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष असताना महाजन यांची २००२ मध्ये भोसरीत सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना प्रथम राष्ट्र, व्दितीय पक्ष आणि तृतीय व्यक्ती (”Vote for nation, not for party;   Vote for the party, not for the person; Vote for the person not for the purse.” ) हे पाहून मतदान करण्यास सांगितले होते. पैशाकडे पाहून मतदान करू नका, तर व्यक्तीकडे पाहून मतदान करा. प्रमोद महाजन यांच्या याच विचारांवर दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी शहरात भाजपची पायाभरणी केली. आज राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून काम करणारा भाजप हा पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यात व देशात बहुमतात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आगामी काळात युवकांचे भविष्य उज्वल आहे, असा विश्वास रवी लांडगे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मोर्चा चिटणीस अमोल दामले यांनी केले. दीपक नागरगोजे यांनी आभार मानले.

Share this to: