राज ठाकरे यांच्या सभांना पुण्यात मैदानं मिळेनात!

पुणे, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांना मैदानं उपलब्ध होत नाहीत अशी परिस्थिती आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. पुण्यातून 9 ऑक्टोबरला प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. मात्र त्यांच्या सभांना मैदान मिळत नसल्याने मनसेची कोंडी झाली आहे. कारण राज ठाकरेंच्या सभांसाठी पुण्यातील विविध मैदानांची चौकशी पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून केली जाते आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदानं उपलब्ध होत नसल्याची स्थिती सध्या आहे. अलका टॉकिज चौकात सभेला संमती दिली जावी अशी मागणी पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शुभारंभाची सभा कसबा मतदारसंघात होणार आहे. त्यासाठी मनसेने टिळक रोड व शनिवार पेठ भागातील रमणबाग शाळेकडे परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी देण्यात आलेली नाही. सरस्वती विद्या मंदिरा मैदानासाठीचा अर्ज करण्यात आला होता, मात्र ते मैदानही मिळालं नाही. पावसाळ्यामुळे डेक्कन या ठिकाणी नदीपात्रात सभा घेता येणार नाही असंही कळवण्यात आलं.

पुणे शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचं वर्चस्व आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सभांसाठी मैदानंच मिळत नसल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतले उमेदवार अजय शिंदे यांनी केला आहे. शैक्षणिक संस्थांची मैदानं उपलब्ध होत नसल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे करण्यात आली आहे. कोणतीच मैदानं उपलब्ध होत नसतील तर टिळक चौकाची जागा सभेसाठी देण्यात यावी अशी विनंती मनसेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Share this to: