भोसरी मतदारसंघाचं ठरलंय, वातावरण फिरलंय; अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यासाठी आश्वासक वातावरण

पिंपरी, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – माजी आमदार विलास लांडे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या राजकीय डावपेचामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. लांडे यांनी उमेदवारी अर्ज भरता क्षणीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा मिळवत पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर मारला आहे. त्यांना भाजप-शिवसेनेतील नाराजांचा पाठिंबा मिळणार हेही स्पष्ट आहे. ही राजकीय खेळी प्रतिस्पर्धी उमेदवार व आमदार महेश लांडगेंना जोरदार धक्का देणारी आहे. आमदार लांडगे यांना मतदारसंघातील आपल्या विरोधकांमध्ये फूट पडण्याची अपेक्षा होती. परंतु, लांडे यांनी आमदार लांडगेंच्या सर्व विरोधकांची एकत्रित मोट बांधून निवडणुकीतील आपला इरादा स्पष्ट केला आहे. त्यातून भोसरी मतदारसंघात “वातावरण फिरलंय”चा प्रत्यय येण्यास सुरूवात झाली आहे. अवघ्या दोनच दिवसात मतदारसंघात निर्माण झालेले हे वातावरण विलास लांडे यांच्यासाठी आश्वासक ठरणारे आहे.

भोसरी मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून ते यंदा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. यंदा कोणत्याच राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज न भरता अपक्ष म्हणून लढण्याचाच त्यांचा इरादा होता. त्यानुसार त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लगेच लांडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला कलाटणी मिळाली आहे. लांडे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजप आणि शिवसेना महायुतीतील नाराजांनाही बळ मिळाले आहे. महायुतीतील अनेक नाराजांनी निवडणुकीत लांडे यांचे काम करण्यास देखील सुरूवात केली आहे.

या मतदारसंघात आमदार लांडगे यांच्या विरोधकांमध्ये ऐन निवडणुकीत फूट पडेल, असे गेल्या एक-दोन महिन्यातील चित्र होते. ही फूट पडावी, अशीच महेश लांडगे यांना अपेक्षा असावी. प्रत्यक्षात ऐन निवडणुकीत उलटेच घडले आहे. सर्व विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यात विलास लांडे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची लांडे यांची एकच राजकीय खेळी भाजप उमेदवार व आमदार महेश लांडगे यांच्या गेल्या पाच वर्षांतील राजकारणावर भारी पडली आहे. एखाद्या फलंदाजाने पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर मारून आपल्या समर्थक प्रेक्षकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करावे त्याप्रमाणे लांडे यांनीही आपल्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केल्याचे गेल्या दोन दिवसांतील चित्र आहे.  

लांडे यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेल्या या उत्साहपूर्ण वातावरणामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात “वातावरण फिरलयं”चा प्रत्यय येण्यास सुरूवात झाली आहे. सध्या या मतदारसंघातल्या चौकाचौकात “आमचं ठरलंय, वातावरण फिरलंय” या एकाच वाक्याचीच चर्चा आहे. मतदारसंघातील सोशल मीडियावर याच वाक्याचा ट्रेंड दिसून येत आहे. अजून प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होण्यापूर्वीच विलास लांडे यांनी “वातावरण फिरलंय”चा ट्रेंड निर्माण करून मतदारसंघात एक प्रकारे बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. या आश्वासक वातावरणामुळे आणि सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यामुळे विलास लांडे हे गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा डाग यंदा पुसून काढतील, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Share this to: