रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने खळबळ; मग समोर आले हे सत्य

अहमदनगर, दि. ५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – नगर जिल्ह्यातील सर्वात चर्चे असलेला मतदारसंघ कर्जत-जामखेडमधील रोहित राजेंद्र पवार(पिंपळवाडी, तालुका पाटोदा) या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाला आहे. या मतदारसंघातील आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे. मात्र, दोघांचीही नावे सारखीच असल्यामुळे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या चर्चेने खळबळ उडवली आहे.

नगर जिल्ह्यातील चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघ. या मतदारसंघात एकूण 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. रोहित राजेंद्र पवार(पिंपळवाडी, तालुका पाटोदा), शेख युनुस दगडू, रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. शेख युनूस दगडू व रोहित राजेंद्र पवार यांनी अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले आहेत.

रावसाहेब मारुती खोत हे अनामत रक्कम अपुरी असलेने अपात्र ठरले. तर आशाबाई रामदास शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीचा पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज होता. मुख्य उमेदवार राम शिंदे यांचा अर्ज मंजूर झाल्याने व अपक्ष उमेदवारीसाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार व राम शिंदे यांच्या नावाने डमी उमेदवारही रिंगणात उतरले होते. त्यातील रोहित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे.

Share this to: