विलास लांडेंना नेहरूनगरमधून मताधिक्य मिळवून देणार; माजी महापौर हनुमंत भोसले, राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल भोसलेंचा शब्द

भोसरी, दि. ५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भोसरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, मनसे तसेच शिवसेना व भाजपमधील नाराजांची साथ मिळवून अपक्ष उमेदवार म्हणून दंड थोपटलेले माजी आमदार विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज भरताच मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. लांडे यांनी शुक्रवारी (दि. ४) रात्री माजी महापौर हनुमंत भोसले आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल भोसले यांची नेहरूनगर येथील कार्यालयात भेट घेऊन निवडणूक रणनितीबाबत चर्चा केली. तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले आणि नगरसेवक राहुल भोसले यांनी नेहरूनगर प्रभागातून लांडे यांना मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द दिला.

माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात अपक्ष शड्डू ठोकला आहे. लांडे यांचे मतदारसंघातील राजकीय महत्त्व ओळखून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मनसेने उमेदवार न देता लांडे यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे शिवसेना व भाजपमधील नाराजांचीही लांडे यांना साथ मिळाली आहे. त्यामुळे लांडे यांनी भोसरी मतदारसंघात पुन्हा एकदा मुरब्बी राजकारण खेळल्याचे मानले जात आहे. लांडे यांच्या या खेळीने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह पसरला आहे. दुसरीकडे मतदारसंघातील लढाई सोपी नसल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या गोटात निश्चितच अश्वस्थता पसरलेली आहे.

लांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तातडीने मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. मतदारसंघातील ज्येष्ठ आणि मार्गदर्शक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांनी पाठिंबा मिळवला. शुक्रवारी (दि. ४) रात्री लांडे यांनी माजी महापौर हनुमंत भोसले आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल भोसले यांची त्यांच्या नेहरूनगर येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. हनुमंत भोसले यांच्यासोबत निवडणूक रणनितीबाबत चर्चा केली. प्रत्येक निवडणुकीत नेहरूनगर परिसरातील मतदार माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. यंदाही येथील मतदार आपला आशिर्वाद देतील, असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केला.

माजी महापौर हनुमंत भोसले यांनी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांची आजपर्यंतची राजकीय वाटचाल आश्वासक राहिल्याचे सांगितले. लांडे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. मतदारसंघातील मतदारांकडून गेल्यावेळी झालेली चूक यंदा होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हनुमंत भोसले व त्यांचे पुत्र राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल भोसले यांनी नेहरूनगर प्रभागातून विलास लांडे यांना मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द दिला. नेहरूनगर परिसर पूर्वीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याा विचाराचा आहे. या भागातील मतदार जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या विचारशक्तीला काधीच पाठिंबा देणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Share this to: