महात्मा गांधी ‘अशा’ देशाचे राष्ट्रपिता होऊच शकत नाहीत; बापू कुटीतील व्याख्यानमालेतला सूर

वर्धा, दि. २ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – ज्या समाजात दंगली होतात, ज्या देशात दंगली घडविल्या जातात, विवेकवाद्यांना मारलं जातं, त्या देशाचे ‘फादर ऑफ नेशन’ महात्मा गांधी म्हणजेच बापूजी होऊच शकत नाहीत,’ असं परखड मत बापू कुटी येथील व्याख्यानमालेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलं.

‘गांधी म्युझिअम ऑफ गोवा’चे संचालक डॉ. सुबोध केरकर यांनी व्याख्यानमालेत बोलताना देशातील सांप्रदायिक प्रवृत्तींवर कठोर शब्दांत प्रहार केला. ‘समाज आजारी असले तर समाजातील नागरिक निरोगी कसे असतील. ज्या देशात दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारख्या विवेकवाद्यांची हत्या होते, त्या देशात आम्ही सुरक्षित कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘आजच्या समाजात सरकारविरोधी बोलणाऱ्याना नक्षलवादी म्हटले जाते, तुमच्या फ्रीजमध्ये बीफ असेल तर तुम्हाला सरळसरळ मारून टाकलं जातं. उघड्यावर शौचाला बसलेल्या दोन दलित बालकांना ठार मारलं जातं, असा समाज निरोगी कसा राहू शकतो,’ अशी विचारणाही त्यांनी केली. ‘गांधीजी जिवंत असते तर त्यांनी आज कुडा सत्याग्रह केला असता. रस्त्यावर कचरा टाकणे ही हिंसा आहे. पर्यावरणाच्या विरोधातील हिंसा आहे. तसंच, ती स्वत:विरोधातील हिंसा आहे,’ असं मत केरकर यांनी मांडलं.

‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘फादर ऑफ नेशन’ असं म्हटलं होतं. त्या अनुषंगानंही केरकर यांनी भाष्य केलं. ‘आपल्या पंतप्रधानांना अमेरिकेत ‘फादर ऑफ नेशन’ असं म्हटलं गेलं. ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, ज्या देशात विवेकवादाला मारलं जातं, त्याचे ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी होऊच शकत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

‘गांधीजींचे सत्याचे प्रयोग फार दूर गेले आहेत. गांधींच्या मारेकऱ्यांचं समर्थन करणारेही हल्ली गांधींच्या पुतळ्याला हार घालतात. त्या हाराला पिस्तुलाचा वास येत असेल. खरंतर राजकारणी गांधी विचारांपासून दूर गेले आहेत. प्रज्ञा ठाकूर निवडून येणं हा त्याचा उत्तम पुरावा आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Share this to: