पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी “पिंपरी चिंचवड टाइम्स”चे संपादक भीमराव पवार यांना तब्बल ५ कोटींचा खटला भरण्याची पाठवली नोटीस; म्हणे बातम्यांमुळे प्रतिष्ठेला हानी पोहोचली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष करणारे लेख लिहिले

पिंपरी, दि. १४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत लिहिलेल्या विविध बातम्यांमुळे “पिंपरी चिंचवड टाइम्स”चे संपादक भीमराव पवार यांना महापालिका आयुक्तांनी तब्बल ५ कोटींच्या आर्थिक नुकसान भरपाईचा खटला भरण्याची नोटीस बजावली आहे. “पिंपरी चिंचवड टाइम्स”ने दिलेल्या बातम्यांमुळे महानगरपालिका, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या निष्कलंक प्रतिष्ठेला व विश्वासार्हतेला हानी पोहोचल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नोटीसमध्ये महापालिका आयुक्तांनी “राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षाला लक्ष करणे यावरून आपला लेख राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही नमूद केले आहे.

महापालिका आयुक्तांनी “पिंपरी चिंचवड टाइम्स”चे संपादक भीमराव पवार यांना पाठवलेली नोटीस जशीच्या तशी  

कायदेशीर नोटीस

प्रति,

पिंपरी चिंचवड टाईम्स

पत्ता – पिंपरी चिंचवड, पुणे

ई-मेल आय डी – bhimrao.pawar815@gmail.com

विषय – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबाबत आपल्या न्यूज पोर्टलवर निराधार व खोट्या बातम्या प्रसिद्ध करूअब्रुनुकसानी केलेबाबत

महोदय,

माझे अशिल पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे मा. आयुक्त (यानंतर “माझे अशिल” अथवा “महानगरपालिका” असे संबोधले जाईल). मी माझ्या अशिलातर्फे मिळालेल्या माहिती व अधिकारान्वये तुम्हाला खालीलप्रमाणे कायदेशीर नोटीस देतो –

१) माझे अशिल पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये दि. ११.१०.१९८२ रोजी स्थापित झालेली संस्था असून मुख्य कार्यालय मुंबई-पुणे रोड, पिंपरी, पुणे – १८ येथे आहे. महानगरपालिका ही शहरातील नागरी सेवा आणि पायाभूत सुविधा पुरविणे, त्याची देखभाल व व्यवस्थापन करणे व आपल्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा, जलनि:सारण, रस्ते आणि सेवा जसे की, संवर्धन, अग्रिशमन, पथदिवे, शिक्षण व आरोग्य इत्यादी या सारख्या मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यात उत्कृष्ट कामिगरी करत आहे. महानगरपालिकेला विश्वात आपल्या तत्परतेसाठी व कार्यक्षेत्रात बजावलेल्या विविध विकास कार्यासाठी ओळखली जाते. महानगरपालिकेत कार्य करणाऱ्या विविध अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या उत्कृष्ठ कार्यासाठी भरीव प्रतिष्ठा मिळविली आहे. तसेच त्यांनी पार पाडलेल्या कामांसाठी ते प्रामाणिकता, उत्कृष्ठता, निष्कलंक प्रतिष्ठा व विश्वासार्हतेसाठी ओळखले जातात आणि त्यांचा आदर केला जातो.

२) तुम्ही पिंपरी चिंचवड टाईम्स एक ऑनलाईन न्यूज पोर्टल असून तुमचे वरील पत्यावर कार्यालय असून माझे अशिल व काम करणारे वरिष्ठ अधिकारी यांच्या सचोटीवर आपल्या न्यूज पोर्टलवर असत्यापित व खोट्या बातम्या प्रसारित करून अनेक आरोप करत आहात. तुमचे हे कार्य माझ्या अशिलाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी, त्यांची विश्वासार्हता इतरांच्या दृष्टीत कमी करण्यासाठी व असत्य, अस्पष्ट व तथ्यहिन बातम्या प्रसारित करत स्वतःच्या न्यूज पोर्टलचे दर्शक वाढविण्यासाठी व स्वस्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी केले गेले आहे.

३) दि. १६.१२.२०२१, १७.१२.२०२१, २०.१२.२०२१ व २५.१२.२०२१ रोजी तुमच्या न्यूज पोर्टलवर माझे अशिल व  तथाकथित वरिष्ठ अधिकारी यांच्याबद्दल खाली नमूद केलेल्या शिर्षकाच्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. ज्या पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.

अ) http://pimprichinchwadtimes.com/?=30368 या लिंकवर दि. १६.१२.२०२१ रोजी “पिंपरी चिंचवड महापालिकेत येण्यासाठी चार कोटी मोजलेल्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी १०० कोटींच्या वसुलीचे ठेवलेय टार्गेट; दोन्ही अधिकारी जोमात, शहर लवकरच जाणार कोमात”

ब) http://pimprichinchwadtimes.com/?p=30424 या लिंकवर दि. १७/१२/२०२१ रोजी शंभर कोटी वसुलीचे टार्गेट ठेवलेले दोन सचिन वाझे कोण? पिंपरी चिंचवड टाईम्सच्या बातमीने खळबळ.

क) http://pimprichinchwadtimes.com/?p=30547 या लिंकवर दि. २०.१२.२०२१ रोजी “आयुक्त साहेब भ्रष्टाचार होणारच असेल तर पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तरी टॅब द्या; राहुल कोल्हटकर यांची मागणी”

ड) http://pimprichinchwadtimes.com/?p=30727 या लिंकवर दि. २५.१२.२०२१ रोजी “पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी महापौरांचा ५५ कोटींचा भ्रष्टाचार…बोगस कागदपत्रे…अन् अजितदादांचे घरगडी आयुक्त राजेश पाटलांची गंधारीची भूमिका..”

४) सदर बातम्या वाचून माझे अशिल महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी वर्ग, जनता, राजनेता इ. अंचबित झाले आहेत, कारण त्यात अनेक तथ्यहिन, खोटे व निराधार विधाने आहेत आणि हा अत्यंत चुकीचा व बेजबाबदार बातमीचा परिणाम आहे. आपल्या उक्त बातमीच्या प्रकाशनामुळे माझे अशिलाचे कधीही न भरून येणारे नुकसान व प्रतिष्ठा कमी झालेली आहे. चुकीच्या बातम्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या परिसरात व सामान्य जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून त्याबाबत कित्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनेक व्यक्तींनी संपर्क साधले असून बातमीच्या खरेपणाबद्दल चौकशी केलेली आहे.

५) आपल्या सदर “पिंपरी चिंचवड टाईम्स” न्यूज पोर्टलवरची बातमी कोणत्याही वाचकाला चुकीच्या पद्धतीने विश्वासात घेवून दिशाभूल करणारी आहे व तुमचा हा प्रयत्न व्देषपूर्ण, दुर्भावनापूर्ण प्रयत्न असून माझ्या अशिलाची प्रतिमा कमी करण्याचा व साधारण जनमानसांच्या नजरेत महापालिकेबद्दल व त्यात काम करणारे अधिकारी, कर्मचारी वर्गाबद्दल नकारात्मक भावना निर्माण करण्याचा व प्रभावित करण्याच्या चुकीच्या हेतूने प्रकाशित केला आहे. तुमच्या बदनामीकारक, तथ्यहीन व खोट्या बातम्यांच्या अहवालाव्दारे तुम्ही माझ्या अशिलांविरोधात नितीमत्ता, नैतिकता व पत्रकारितेच्या कर्तव्याचे पूर्ण उल्लंघन करून पूर्वग्रहाने चुकीचे वर्णन केलेले आहे. माझ्या अशिलाबद्दल खळबळजनक वृत्तांकन करून तुम्ही स्वतःचे व्यवसायिक लाभ व वाढ मिळविण्यासाठी केलेला दुर्भावनायुक्त हेतू आहे. माझ्या अशिलाच्या प्रतिष्ठेच्या किंमतीवर सनसनाटीपणाच्या माध्यमातून सामान्य जनतेमध्ये खळबळ उडवून आपल्या ऑनलाईन पोर्टलवर स्वस्त प्रसिद्धी मिळविण्याचा तुमचा उद्देश आहे.

६) प्रकरणाचा तथाकथित वसुली व भ्रष्टाचाराबद्दलचे वृत्तांत खरे तर वस्तुस्थितीशी पूर्णपणे विसंगत असून खोटी व चुकीची विधाने ही प्रकाशकाने पूर्णपणे जाणीवपूर्वक प्रकाशित केले आहे. सत्य व बरोबर तथ्ये तपासण्यासाठी किंवा अस्पष्ट लेखातील मजकूर / विवेचन पडताळण्यासाठी कोणतेही प्रयत्न तुम्ही केलेले दिसून येत नाही.

७) तुमच्याव्दारे दिलेल्या खोटया बातम्या कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्याने पूर्णपणे निराधार आहेत व तुमच्या खोट्या बातम्यांमुळे माझ्या अशिलाची एक शासकीय यंत्रणा म्हणून प्रतिमा डागाळण्याचा उद्देश आहे.

८) मुख्यतेने तुम्ही तुमच्या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या दिनांक १६.१२.२०२१ व १७.१२.२०२१ रोजीच्या वृत्तांकनात तथाकथित बडे अधिकारी व दोन नगरसेविका यांच्याबद्दल असून कोणतेही नाव न घेणे यावरून तुमचे स्त्रोत हे वैध नसल्याचे व तुमच्याकडे कोणताही विश्वासार्ह पुरावा नसल्याचे समजून येते. तसेच माझे अशिलावर कोणत्याही वैध स्त्रोताशिवाय मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण वारंवार गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहात.

९) तुम्ही तुमच्या ऑनलाईन पोर्टलवर महानगरपालिकेत येण्यासाठी दोन बडे अधिकाऱ्यांनी तब्बल चार कोटी मोजल्याची चर्चा महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात असल्याचे भ्रामक व अस्पष्ट विधान केले आहे. महापालिकेत विविध अधिकारी व कर्मचारी तत्परतेने व निष्ठेने कार्य करतात. तुमच्या तथाकथित दोन बडे अधिकाऱ्यांची चार कोटींच्या बदल्यात चारशे कोटी मिळविण्याची काल्पनिक कथा तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय व पत्रकारिकतेच्या नैतिकतेच्या जबाबदारीला बाजूला ठेवून करत आहात. तुमच्या बेजबाबदार व अस्पष्ट विधानामुळे सर्व अधिकारी वर्ग व त्यांनी शहराच्या विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा अपमान आहे.

महापालिकेतून दिली जाणाऱ्या सर्व निविदा या लोकतांत्रिकपणे ठरविलेल्या सर्व मानकांना पूर्ण केल्यानंतर ठेकेदारांना कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर दिली जातात. निविदा प्रक्रिया सर्व प्रकारची गोपनीयता पाळून बंद पाकिटाव्दारे केली जाते. आणि सर्वात कमी दर असलेल्या ठेकेदारालाच कामे दिली जातात व दिली जाणारी कामे तद्नुषंगिक मा. स्थायी समिती यांच्या मान्यतेनेच दिली जातात. तसेच महानगरपालिकेच्या पोर्टलवर सर्व माहितीसाठी व पारदर्शकतेसाठी उपलब्ध केली जाते.

महानगरपालिकेचा इतिहास पहाता अनेक ठेकेदारांवर त्यांनी केलेल्या उल्लंघनावरून त्यांच्यावर शास्ती लावून काळ्या यादीत टाकल्याचे व त्यांच्यावर कारवाई केल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतील. ठेकेदारांना त्यांचा अनुभव, कार्यशैली व मागिल कामगिरीचा विचार करून कामे दिली जातात. तुम्ही हे सर्व जाणून बुजून अथवा प्रशासनाच्या कामकाजाचे स्वरूपाचे अथवा तथ्यांच्या अज्ञानामुळे वा गैरसमजाने प्ररित असल्याचे दिसून येते.

तसेच तथाकथित नगरसेविका व दोन बडे अधिकाऱ्यांची साठगाठ असलेली ही तथ्यहिन असून आपली काल्पनिक शक्तीने बनवलेली कथा हास्यास्पद आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षाला लक्ष करणे यावरून आपला लेख राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येते.

१०) तुमच्या उपरोक्त कृत्यांसाठी, तुमच्यावर भारतीय दंड संहितेच्या इतर विविध तरतुदींनुसार खटला भरले जाण्यास पुरेसे आहे. तसेच महानगरपालिका व वरिष्ठ अधिकारी/कर्मचारी यांच्या निष्कलंक प्रतिष्ठेला व विश्वासार्हतेला हानी पोहोचविल्याबाबत रक्कम रुपचे ५ करोडचा आर्थिक नुकसान भरपाईचा खटला भरण्याचे स्पष्ट निर्देश माझे अशिल यांनी मला दिलेले आहेत.

११) तथापि तुमच्याविरुद्ध कठोर फौजदारी, दिवाणी व वर नमुद केल्याप्रमाणे रक्कम रुपये ५ करोडचे आर्थिक नुकसान भरपाई खटला व इतर कायदेशीर कारवाईंचा अवलंब करण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला शेवटची/अंतिम संधी देऊ इच्छीतो आणि अशा प्रकारे तुम्हाला या नोटीसीव्दारे खालील बाबी पूर्ण करण्यासाठी सांगतो :-

अ) तुमच्या संतापजनक व खोट्या बातम्यांसाठी तुम्ही लेखी स्वरूपात बिनशर्त माफी मागावी व तुम्ही चुकीचा लेख ज्या ठळकपणे प्रकाशित केला होता त्याच प्रमुखतेने तुमच्या न्यूजपोर्टलवर व इतर माध्यमांवर खरी व योग्य तथ्ये प्रकाशित करण्याचे आवाहन केले जात आहे.

ब) विवादित लेख तुमचे ऑनलाईन पोर्टल, डिजीटल मिडीया, सोशल मिडीया व इतर माध्यमांवरून ताबडतोब काढून टाकण्याचे आवाहन आम्ही करतो. तसेच यापुढे विवादीत लेखाचे व त्याबाबतचे कोणतेही पुढील / पुनरावृत्ती थांबविण्याचे आवाहन केले जात आहे.

क) भविष्यात तुम्ही माझ्या अशिलाबाबत कोणतीही खोटी बातमी देणार नाही व ही माझ्या अशिलातर्फे दिलेली अंतिम संधी समजून पुन्हा अशा प्रकारचे खोट्या बातम्या देणार नाही अशी हमी द्यावी.

१२) कृपया लक्षात घ्या की ही तत्काळ सूचना मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत तुम्ही उपरोक्त बाबी पूर्ण करण्यास अयशस्वी झाल्यास, माझ्या अशिलाकडे तुमच्यावर सक्षम न्यायालयात कठोर फौजदारी, दिवाणी व इतर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. तुम्ही केलेल्या बेकायदेशीर कृत्यामुळे आमचे अशिल करणार असलेल्या सर्व कारवाया पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या जोखमीवर, खर्चावर व परिणामांवर होतील याची नोंद घ्यावी.

या नोटीसची प्रत पुढील संदर्भ व कारवाईसाठी माझ्या कार्यालयात रेकॉर्डसाठी ठेवण्यात येत आहे.

दिनांक – ३०.१२.२०२१

ठिकाण – पुणे

या नोटीसच्या शेवटी मारूती जी. भापकर या वकिलाची सही आहे.

Share this to: