पिंपरी-चिंचवडकरांचे ५५ कोटी लुटण्यासाठी राष्ट्रवादीच्या माजी महापौराने सादर केली ७ कोटींची बोगस बँक गॅरंटी; आयुक्त राजेश पाटील दबावाखाली काम करताहेत, नगरसेवक तुषार कामठेंचा हल्लाबोल

पिंपरी, दि. १३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “अ” आणि “ब” क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते आणि गटर सफाईचे तब्बल ५५ कोटींचे काम मिळवण्यासाठी सेक्युअर आयटी फॅसिलीटी मॅनेजमेंट या ठेकेदार कंपनीने सुमारे ७ कोटी रुपयांची बोगस बँक गॅरंटी सादर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी गुरूवारी (दि. १३) पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले. महापालिका आयुक्त राजेश पाटील हे दबावाखाली काम करत असून, गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक पुरावे देऊनही प्रशासन संबंधित ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या कामाची निविदा भरताना विद्यमान नगरसेवक असलेल्या माजी महापौरांच्या बँक खात्यातून अनामत रक्कम भरण्यात आली असून, त्याची माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याचेही कामठे यांनी सांगितले. दरम्यान, हा माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा असून राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या आदेशावरून पिंपरी-चिंचवडकरांचे ५५ कोटींच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते व गटर सफाईच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदेत अनेक अटी व शर्तींचा उल्लेख करण्यात आला होता. “अ” आणि “ब” क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते व गटर सफाईचे काम सुमारे ५५ कोटींचे आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या सेक्युअर आयटी फॅसिलीटी मॅनेजमेंट या ठेकेदार कंपनीला महापालिकेने पात्र ठरवले आहे. परंतु, या ठेकेदार कंपनीने पिंपरी-चिंचवडकरांचे ५५ कोटी रुपये लुटण्याच्या उद्देशाने निविदेतील अटी व शर्तींचे पालन करण्यासाठी अनेक बोगस कागदपत्रे सादर केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी गेल्या महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सेक्युअर आयटी फॅसिलीटी मॅनेजमेंट या ठेकेदार कंपनीने निविदेसोबत दिलेली बोगस कागदपत्रेच सादर केली. ही सर्व बोगस कागदपत्रे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनाही दिले.

आता या बोगस कागदपत्र प्रकरणातील आणखी एक धक्कादायक वास्तव नगरसेवक तुषार कामठे यांनी समोर आणले आहे. रस्ते व गटर सफाईच्या ५५ कोटींच्या कामांसाठी सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट या ठेकेदार कंपनीने तब्बल ६ कोटी ९० लाख ७१ हजार रुपयांची बोगस बँक गॅरंटी सादर केली आहे. या ठेकेदार कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) मुंबईतील फोर्ट शाखेने ही बँक गॅरंटी दिल्याची कागदपत्रे महापालिकेला सादर केली आहेत. त्यावर बँक अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ५५ कोटींच्या या कामांसाठी ठेकेदार कंपनीने सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत की खरी आहेत, हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समजली नाहीत, यावर लहान मुलांचा तरी विश्वास बसेल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याप्रकरणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन थेट महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावरच हल्लाबोल केला. आयुक्त राजेश पाटील दबावाखाली काम करत आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेकेदार कंपनीने महापालिकेला दिलेली बोगस कागदपत्रे सादर केली. संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकून महापालिकेने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आपण केली होती. आयुक्त राजेश पाटील यांनाही प्रत्यक्ष भेटून सर्व पुरावे दिले व कारवाईची मागणी केली. पण प्रशासनाकडून तसे होताना दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

धक्कादायक बाब म्हणजे निविदा भरताना कामांसाठी देण्यात येणारी अनामत रक्कम विद्यमान नगरसेवक व माजी महापौरांच्या बँक खात्यातून भरण्यात आली आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती मिळण्यासाठी वारंवार विचारणा करून देखील टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नगरसेवक कामठे यांनी केला. प्रशासनाकडून एका नगरसेवकालाच माहिती दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पुढील आठवड्यात भेट घेऊन सर्व पुरावे असणारी कागदपत्रे देणार आहे. तसेच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडेही कागदपत्रे सादर करुन संबंधित ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी करणार असल्याचेही नगरसेवक कामठे यांनी सांगितले.

Share this to: