खासदार संजय राऊत यांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट, महाराष्ट्रात येण्याचे दिले आमंत्रण

उत्तर प्रदेश, दि.१३ (पिंपरी चिंचवड टाइम्स)  – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेने देखील आपली कंबर कसली आहे. युपीत शिवसेना ५० ते १०० जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्या पार्श्वभुमीवर राऊत सध्या उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. आज राऊत यांनी संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांची मुझफ्फरनगर येथे भेट घेतली आहे.

त्यानंतर टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. टिकैत म्हणाले की, मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे. असे टिकैत यांनी सांगितले आहे. तसेच आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे देखील टिकैत यांनी स्पष्ट केले आहे.

टिकैत यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण


“आमच्यामध्ये कुठलीही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्ही निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही,” असे स्पष्ट मत टिकैत यांनी मांडले आहे. याआधी संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. तसेच राकेश टिकैत कोणत्याही नेत्याला भेटत नाहीत. तसेच ते राजकारणात सहभागी होत नाहीत. तरीदेखील ते मला भेटत आहेत, असे राऊत यांनी सांगितले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये दुपारी भेट झाली.

आणखी १५ मंत्री राजीनामे देणार


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपुर्वी गेल्या तीन दिवसांत तीन मंत्र्यानी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा झटकाच मानावा लागेल. आणखी १५ मंत्री भाजपला सोडणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Share this to: