भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात, देशातील आर्थिक मंदीला मुघल आणि इंग्रज जबाबदार

मुंबई, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मुघल सम्राट आणि ब्रिटिशांनी भारतावर हल्ले केल्याने भारतामध्ये आर्थिक मंदी आल्याचे अजब वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. मुघल काळ सुरु होण्याआदी भारताचा जागतिक व्यापारामधील हिस्सा हा ३६ टक्क्यांपर्यंत होता. त्यानंतर भारतामध्ये इंग्रजांचे आगमन झाले आणि हा हिस्सा २० टक्क्यांपर्यंत कमी झाला. मुघल आणि ब्रिटिशांमुळेच भारतामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये घसरण झाली, असे मत योगी यांनी मुंबईत बोलताना नोंदवले ते वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूएचईएफ) बोलत होते.

देशामध्ये आर्थिक मंदीची स्थिती निर्माण झाली असतानाच मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डब्ल्यूएचईएफ परिषदकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही अर्थतज्ज्ञांनी भारतामधील आर्थिक विकास कमी दराने होत असतानाच त्याचा उल्लेख हिंदू ग्रोथ रेट असा केला होता. मात्र इंग्रजांना महान समजणाऱ्यांनी भारताचा विकास दर केवळ चार टक्कांवर आणला. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर परिवर्तन झाले आहे,’ असं मत योगी यांनी मांडले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये उद्योगांना भरपूर संधी असल्याचे म्हटले. शेती आणि शेतीच्या संबंधित उद्योग आणि पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये उत्तर प्रदेश महत्वाची भूमिका पार पडत आहे असं मतही योगी यांनी नोंदवले. उत्तर प्रदेशमधील गुंतवणूकदारांच्या परिषदेनंतर दोन लाख कोटींची प्रत्यक्ष गुंतवणूक राज्यात झाल्याचा दावा योगी यांनी यावेळी बोलताना केला.

‘जेव्हा एखादी जात किंवा समाज आपली ओळख गमावतो आपला सन्मान गमावतो, आपले अस्तित्वाशी झगडत असतो त्यावेळी त्याला स्वत:बद्दल अभिमान वाटत नाही. अशा निराशेच्या गर्तेत असलेला समाज स्वत:चा शोध घेत फिरत असतो. असंच भारताबरोबर झालं. आम्ही धर्म म्हटलं लोकांनी ते धर्मनिरपेक्षतेशी जोडलं. आम्ही संस्कृत म्हटलं तर लोकं म्हणाले नाही ही उर्दू आहे. आम्ही हिंदी म्हटलं तर लोकांनी ते नाकारुन या वेगवेगळ्या भाषा असल्याचं म्हटलं. कुठे मराठी, कुठे भोजपुरी, कुठे तमीळ, कुठे मल्याळम अशी वेगवेगळी ओळख भाषांना देण्यात आली. आम्ही एका राष्ट्राबद्दल बोललो तर त्यांनी नाही हे तर बहुराष्ट्र आहे असं सांगितलं. आम्ही एकसंघतेबद्दल बोललो आणि लोक विविधता शोधत गेले,’ अशी टीका योगी यांनी केली.

योगी यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेबद्दलही भाष्य केले. या वर्षी लोकसभा निवडणुकांसाठी १ लाख ६३ हजार मतदान केंद्रे देशभरामध्ये होती मात्र कोणत्याही केंद्रावर हिंसा झाली नाही. उत्तर प्रदेशमध्ये आव्हाने अनेक आहेत. आधी दर दुसऱ्या दिवशी राज्यात दंगल व्हायची, सरकारी कामाला शिस्त नव्हती, गुंडांचे वर्चस्व होते. मात्र आज उत्तर प्रदेशची ओळख बदलली आहे. आम्ही आव्हानांचे संधीमध्ये रुपांतर करुन बदल घडवून दाखवला आहे. आम्ही प्रयागराज कुंभ मेळावा २०१९चे यशस्वी आयोजन केले. आधी कुंभ मेळाव्याची ओळख गोंधळ, गुन्हे, चेंगराचेंगरी अशी होती. मात्र पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली यंदा कुंभ मेळ्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याशिवाय आम्ही १५ व्या प्रवासी भारतीय संम्मेलनाचेही वाराणसीमध्ये आयोजन केले आणि ते यशस्वी करुन दाखवल्याचे योगी यांनी सांगितले.

Share this to: