स्मार्ट सिटीअंतर्गत पूर्णत्वास आलेले प्रकल्प महापालिकेच्या संबंधित विभागांकडे हस्तांतरीत करा; महापौर माई ढोरे यांच्या सूचना

पिंपरी, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी पूर्णत्वास येणाऱ्या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करून ते प्रकल्प महापालिकेच्या संबंधित विभागांकडे हस्तांतरीत करा, अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी अधिकाऱ्यांना गुरूवारी (दि. ६) दिली.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाचा एबीडी व पॅन सिटी प्रकल्पांच्या कामांचा दोन दिवसीय पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पिंपळेगुरव व पिंपळेसौदागर परिसरात एबीडीअंतर्गत (ऐरिया बेस डेव्हलपमेंट) असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहाय्यक मुख्य कार्यकारी अध‍िकारी लक्ष्मीकांत कोल्हे, शिर्के कंट्रक्शनचे मॅनेजर नितीन कदम, प्रकल्प व्यवस्थापक लावण यांच्यासह अध‍िकारी व कर्मचारी उपस्थ‍ित होते.

दौऱ्यापूर्वी पिंपळेगुरव व पिंपळेसौदागर येथील संपूर्ण एबीडी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विकासकामांची प्रगती, प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा कालावधी, उपलब्ध निधी यासंदर्भात चर्चा करून उपलब्ध निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करणे तसेच प्रस्तावित कामांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संचालक मंडळाने पिंपळेगुरव येथील जिजामाता उद्यान, परिसरातील रस्ते, चौकांमध्ये सुरु असलेली कामे, कृष्ण विहार चौक येथील आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तयार केलेले प्लेस मेकिंग, चिल्ड्रेन प्ले एरिया, सुदर्शन चौकातील सेव्हन स्टार रोड, योगा पार्क, बीआरटी रोड, कोकणे चौकातील रस्ते, टॉयलेट ब्लॉक, फुटपाथ तसेच रहाटणी चौकात सुरु असलेल्या कामांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापौर माई ढोरे यांनी नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, “फेब्रुवारी २०२२ पर्यंत संपूर्ण कामे नागरिकांसाठी खुली करायला हवी. त्यानुसार कामांचा वेग वाढवा. हातात घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरे काम हाती घेऊ नका. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या रस्त्यांना जागेची अडचण असल्यास स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने सोडवून स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा, असे त्यांनी सांगितले.” नगरसेवक सचिन चिखले म्हणाले, “पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड शहरात स्मार्ट रस्ते, फुटपाथ यांसारखे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प राबवत आहे. परंतु, अनेक ठिकाणी नव्याने झालेल्या रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याचे पाहावयास मिळते. तसेच स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून विकासात भर पडत आहे. परंतु, खासगी केबल चालकांकडून या स्ट्रीट पोलचा उपयोग केबल टाकण्यासाठी करून घेण्यात येत असून महापालिकेच्या मदतीने हे सर्व अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. तसेच विकासकामांच्या शिल्लक निधीतून नवीन कामे हाती घेण्यात यावीत.”

Share this to: