अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी वाहिली श्रद्धांजली

पिंपरी, दि. ५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि. ५) श्रद्धांजली वाहण्यात आली.

महापौर माई ढोरे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सिंधुताई सपकाळ या थोर समाजसुधारक होत्या. त्यांनी हजारो अनाथ मुलामुलींचा स्वत:च्या मुलाप्रमाणेच सांभाळ करुन वात्सल्याचा, ममतेचा आदर्श निर्माण केला आहे. सिंधूताईंचे जीवन अतिशय कष्टप्रद आणि संघर्षमय होते.  प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मोठ्या जिद्दीने त्यांनी केलेला जीवनप्रवास शब्दात व्यक्त करता येणार नाही. सिंधूताईंचे कार्य यापुढेही चालू ठेवण्यासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, अशा शब्दांत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसेचे गटनेते सचिन चिखले, उपायुक्त आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, योगेश वंजारे, आरपीआयचे बाळासाहेब भागवत, स्वप्निल कांबळे, वाहतुक आघाडीचे अजीज शेख, भारतीय बौध्द महासभेचे बापूसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.             

Share this to: