पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर सुरक्षित प्रवासासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, दि. २४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरून अपघात विरहित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत. परंतु, नियमांकडे दुर्लक्ष करून वाहनचालक वाहने चालवत असल्याने एक्स्प्रेस हायवेवर अनेक अपघातांना निमंत्रण मिळत होते. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचे नियम सांगणारे तसेच नियमभंग झाल्यास होणारी कारवाई व कायदेशीर दंडाविषयी ठिकठिकाणी सूचना फलक व वाहतूक चिन्हांची माहिती देणारे फलक लावण्याची मागणी राज्याचा गृहविभाग आणि महामार्ग सुरक्षा विभागाकडे केली होती. एक्स्प्रेस हायवेवर सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी ते गेल्या तीन वर्षांपासून या दोन्ही विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करत होते. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, महामार्ग सुरक्षा विभागाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी वाहतूक नियमांबाबत स्पष्ट सूचना देणारे तसेच वाहतूक चिन्हांचे फलक लावण्याचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. त्यामुळे एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच एक्स्प्रेस हायवेवरून वाहने चालवावीत, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांचे अंतर कमी करण्याच्या उद्देशाने भाजप-शिवसेना युती सरकारने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती (एक्स्प्रेस हायवे) मार्गाची निर्मिती केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार पदरी असणाऱ्या या एक्स्प्रेस हायवेवरून सुखकर प्रवास व्हावा यासाठी वाहतुकीचे काही नियम निश्चित करण्यात आले. परंतु, प्रशस्त असलेल्या या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. कार, जीप, टेम्पो या प्रकारच्या हलक्या वाहनांनी एक्स्प्रेस हायवेच्या मध्य लेनमधून, जड व अवजड वाहनांनी सर्व्हिस लेनलगतच्या डावीकडील लेनमधून तसेच वाहनांना ओलांडताना उजवीकडील लेनचा अवलंब करणे नियमाने बंधनकारक आहे. त्यामुळे उजवीकडील लेन कायम रिकामी राहून वाहनांना ओव्हरटेक करणे सोपे जाईल, असा त्यामागचा हेतू आहे.

परंतु, वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी असलेल्या लेनमधून वाहने चालविली जात असल्याचे दिसून येत होते. तसेच या लेनमधून प्रवास करताना वाहनाचा ताशी ८० किलोमीटर वेग असणे आवश्यक असताना त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालविली जात असल्याचेही कायम निदर्शनास येत होते. परिणामी घाटामध्ये वाहतूककोंडी नित्याचीच झाली होती. तसेच अनेकदा अपघात होऊन कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करताना ही बाब कायम निदर्शनास येत होती. त्यामुळे एक्स्प्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी वाहतूक नियमांची व चिन्हांची माहिती देणारे तसेच वाहतूक नियम मोडल्यास केली जाणारी कारवाई आणि कायदेशीर दंडाबाबत माहिती देणारे फलक लावण्यात यावेत, यासाठी राज्याचा गृह विभाग, महामार्ग सुरक्षा विभाग तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला. २०१६ पासून हा पत्रव्यवहार सुरू होता. त्याचप्रमाणे विधानसभेच्या अनेक अधिवेशनातही हा मुद्दा आपण उपस्थित केला होता.

याबाबत राज्याच्या गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दोन्ही बाजूला वाहतूक नियमांची व चिन्हांची माहिती देणारे, वाहतूक नियम मोडल्यास संबंधित वाहनांवर करण्यात येणारी कायदेशीर कारवाई, कोणत्या प्रकारच्या वाहनांनी कोणत्या लेनमधून प्रवास करावा याबाबत माहिती देणारे फलक लावण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. परंतु, आता सुरक्षित प्रवासाची सर्वात मोठी जबाबदारी ही वाहनचालकांवर असणार आहे. वाहनचालकांनी फलकांवर नमूद केलेल्या वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालवावीत. त्यातून स्वतः सुरक्षित राहून इतर प्रवाशांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.”

Share this to: