नवी सांगवीतील गणेशनगरमध्ये पत्राशेडला लागली आग; दोन नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

चिंचवड, दि. २९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – नवी सांगवीतील फेमस चौक, गणेशनगर येथे एका पत्राशेडला बुधवारी (दि. २९) अचानक आग लागली. किशोर मकवाणा आणि ललित म्हसेकर या दोन नागरिकांनी प्रसंगवधान राखून तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाने घटनास्थळी लगेच धाव घेऊन आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

नवी सांगवीतील फेमस चौक, गणेशनगर येथे एक पत्राशेड मारून मंदिर उभारण्यात आले होते. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास या पत्राशेडला अचानक आग लागली. ही आग तेथील जागरूक नागरिक किशोर मकवाणा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पिंपरी-चिंचवड भाजप ओबीसी मोर्चाचे प्रसिद्धीप्रमुख ललित म्हसेकर यांना फोन करून आगीची माहिती दिली.

ललित म्हसेकर यांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तातडीने पोहोचल्या. अग्निशमन दलातील जवानांनी पत्राशेडला लागलेली आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणालाही इजा पोहोचली नाही. अग्निशमन दलाने केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन आग विझवल्यामुळे किशोर मकवाणा आणि ललित म्हसेकर यांनी जवानांचे आभार मानले.

Share this to: