खुन प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार

चिंचवड, दि.२७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सांगवी येथे योगेश जगताप या तरुणाचा गोळ्या झाडून भर दिवसा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी चाकण जवळ असलेल्या कुरवंडी गावात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस आरोपींना पकडण्यासाठी गेले असता आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला.

पोलिसांनी देखील प्रतिउत्तर देत गोळीबार केला आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेत एक पोलीस जखमी झाला आहे. योगेश रवींद्र जाधव (वय ३६, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार होता.

पोलिसांनी गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली होती. आणखी तिघेजण चाकण जवळ असलेल्या कुरवंडी गावात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची चार पथके आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेली. पोलिसांना पाहताच आरोपींनी थेट पोलिसांवर गोळीबार केला.

प्रतिउत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार गेला. आरोपींसोबत पोलिसांची झटापट झाली. त्यात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र लपून बसलेल्या तिन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Share this to: