नवीन बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने विवाहितेला सासरच्या लोकांनी ठेवले डांबून

दिघी, दि.२५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – नवीन बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. विवाहितेने पैसे न आणल्याने तिला सासरच्या लोकांनी डांबून ठेवले. तसेच तिचा छळ केला. हा प्रकार ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, ता. निफाड येथे घडला.

पती किशोर दशरथ मोहिते (वय २५), दिर ईश्वर दशरथ मोहिते (वय ३०), दिर ज्ञानेश्वर दशरथ मोहिते (वय ३३), दिर संजय दशरथ मोहिते (वय ३५), सासरे दशरथ मोहिते (वय ५०), सासु (वय ४५), आणि ३ जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात २४ डिसेंबर २०१९ रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासरच्या लोकांनी फिर्यादी विवाहितेकडे नवीन बुलेट घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने ते पैसे आणले नाहीत म्हणून आरोपींनी विवाहितेला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच पतीने विवाहितेला शारीरिक सुखापासून वंचित ठेवले.

आरोपींनी विवाहितेला तीन दिवस घरामध्ये डांबुन ठेवले. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने माहेरी आल्यानंतर या प्रकरणी तक्रार दिली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Share this to: