मी स्वतःच ईडी कार्यालयात जाऊन ‘पाहुणचार’ स्वीकारणार; दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही – शरद पवार

मुंबई, (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर असेल, त्यामुळे मी स्वतः २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होईल. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांत माझेही नाव आहे. माझ्या आयुष्यातील हे दुसरे प्रकरण आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे काल संध्याकाळी कळले. त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले. पुढील काही दिवस मी निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नसेल किंवा कोणत्या अदृश्य ठिकाणी गेलो तर, त्याआधीच २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात मी स्वतःहून जाणार आहे. अधिकाऱ्यांना माझ्याकडून जी माहिती हवी आहे ती देईन. त्यांना जो काही पाहुणचार करायचा असेल तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे. ईडीला सहकार्य करण्यासाठी माझे हात सदैव तत्पर असतील, असेही ते म्हणाले.

दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही, अशी कोपरखळीही पवार यांनी कुणाचे नाव न घेता मारली. अशा प्रकारची कारवाई होण्याचा माझ्यावरील हा दुसरा प्रसंग असे त्यांनी सांगितले. १९८० मध्ये अमरावतीमध्ये एका शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मला अटक करण्यात आलीली होती मात्र माझ्या बाजुने निकाल लागला व प्रश्न शिल्लक राहिला नाही असे ते म्हणाले.

ईडीला संपूर्ण सहकार्य करायची माझी भूमिका असून नक्की गुन्हा काय आहे, हे मला समजावून घ्यायचे आहे असे ते म्हणाले. त्याचबरोबर ईडीच्या अधिकाऱ्यांना जी काही माहिती हवी असेल ती देईन शिवाय अन्य काही पाहुणचार त्यांना करायचा असेल तर त्यासाठीही माझी तयारी असल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली आहे. मात्र, शाहू फुले आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा मी व्यक्ती असून संविधानावर विश्वास ठेवतो असे त्यांनी सांगितले.

Share this to: